अश्लील गाणी, मद्यपान करून वादन आणि सायलेंट झोनमध्ये डीजेला मनाई
श्रीकांत पाचकवडे
अकोला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील डीजे वादकांची बैठक शहर वाहतूक शाखेत घेण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक शिस्त अबाधित राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी डीजे वादकांना कडक सूचना दिल्या.
या बैठकीत पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करूनच डीजे व अन्य वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच अश्लील आणि आक्षेपार्ह गाणी वाजविणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने डीजे वादकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही बैठकीत सांगण्यात आले.
मद्यपान करून डीजे वाजविण्यास मनाई
डीजे किंवा अन्य वाद्ये वाजविणाऱ्या व्यक्तींनी मद्यपान करून वादनासाठी येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सायलेंट झोनमध्ये डीजे बंद
शासनाने निर्धारित केलेल्या वेळेच्या मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून सायलेंट झोनमध्ये डीजे अथवा अन्य ध्वनिक्षेपक वाजवू नयेत, असेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.
नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन
गणेशोत्सव काळात शांतता, सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी डीजे वादकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांचे पालन करून गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह कायम ठेवावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.






