दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही, अधिसूचनेच्या कार्यवाहीकडे लक्ष
म्हसला, मोहगव्हाण आणि जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीचा घेतला आढावा
श्रीकांत पाचकवडे
अकोला : पश्चिम विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि खरीप पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. म्हसला, मोहगव्हाण आणि जऊळका येथे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला.
म्हसल्यात नुकसानग्रस्त सोयाबीन, तुरीची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारंजा तालुक्यातील म्हसला येथे शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेताला भेट दिली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त सोयाबीन आणि तूर पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली.
मोहगव्हाणमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या
मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हाण येथे शेतकरी अनिल भगरे तसेच अब्दुल नईम शेख रहीम यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन, तूर यांसह खरीप पिकांना मोठा फटका बसल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन देत यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही लवकर सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जऊळक्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा
मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे शेतकरी संतोष सखाराम डुंबळे यांच्या शेताच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांचे नुकसान आणि पाणी उपलब्धतेबाबत माहिती घेतली. शेतकरी संतोष यांच्या आई शकुंतलाबाई यांनीही परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
घोषणेचा पुनरुच्चार; आता मदतीच्या अंमलबजावणीकडे लक्ष
या दौऱ्याचे विशेष महत्त्व म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती मदत प्राधान्याने देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यापूर्वीही राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लवकरच प्राथमिक अधिसूचना काढण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे आता वाशिमसह नुकसानग्रस्त भागांसाठी शासनाकडून प्रत्यक्ष मदतीची कार्यवाही कधी आणि कोणत्या स्वरूपात सुरू होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पाणी आणि चाऱ्यासाठीही नियोजन
आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येईल. त्याचबरोबर पशुधनासाठी चारा उपलब्धतेबाबतही शासनाकडून दक्षता घेतली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत थेट मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावेळी खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सईताई डहाके, आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी बांधावर येऊन परिस्थितीची पाहणी केली, नुकसान ऐकून घेतले आणि मदतीचा पुनरुच्चार केला. आता या आश्वासनाचे प्रत्यक्ष मदतीत रूपांतर कधी होते, याकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






