श्रीकांत पाचकवडे
अकोला : दि. २५ व २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. अकोला शहरासह अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, हिवरखेड आणि तेल्हारा या प्रमुख ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळी भर पावसात जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात शहरात रूट मार्च काढण्यात आला.
जिल्ह्यात यंदा १,९८७ गणेशमूर्तींची स्थापना झाली असून ५१ सार्वजनिक विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शांतता समितीच्या बैठका, गणेश मंडळांशी संवाद, कॉर्नर बैठका तसेच दंगाकाबू आणि मॉब डिस्पर्सलच्या सरावाद्वारे बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली आहे.
५९ शांतता समित्या, ४२१ ग्रामभेटी आणि ४८ रूटमार्च
पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात ५९ शांतता समिती बैठका आणि ४२१ ग्रामभेटी घेण्यात आल्या आहेत. तसेच ४८ गावांमध्ये रूटमार्च काढून पोलिसांची मनुष्यबळ व शस्त्रसज्जता नागरिकांसमोर प्रदर्शित करण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक यांनी महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दि. २३ सप्टेंबर रोजी अकोट येथे विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमार्च घेण्यात आला. तर दि. २४ सप्टेंबर रोजी अकोला शहरात पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली भव्य पथसंचलन करण्यात आले.
२१५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र केल्या आहेत. सुमारे २,१५० रेकॉर्डवरील व्यक्तींवर विविध कलमांनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉण्ड घेण्यात आले आहेत.
तसेच विसर्जन काळात शांतता भंग होण्याची शक्यता असलेल्या सुमारे १,११० व्यक्तींना हद्दीबाहेर राहण्याबाबत BNS कलम १६३ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
अकोला व अकोट शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, विसर्जन मार्गालगतच्या मिश्र वस्त्यांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यात येणार आहे.
३५००हून अधिक पोलीस बंदोबस्तात
गणेश विसर्जन आणि त्याच कालावधीत होणाऱ्या अन्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळ रस्त्यावर तैनात राहणार आहे.
७ पोलीस उपअधीक्षक
१२७ पोलीस अधिकारी
सुमारे २,३०० पोलीस अंमलदार
अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील २७५ प्रशिक्षणार्थी अंमलदार
नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील १८० महिला प्रशिक्षणार्थी
नाशिक पोलीस अकादमीतील २० प्रोबेशनरी PSI
SRPF ची १ कंपनी व १ प्लाटून
सुमारे ८५० होमगार्ड
जलद प्रतिसादासाठी RCP ची ४ पथके
जिल्ह्यात विविध ठिकाणी ५ स्ट्रायकिंग फोर्स
असा व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
३५९ CCTV, ४८ ड्रोन आणि २४० बॅरिकेड्स
विसर्जन मिरवणुकांवर नजर ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
CCTV कॅमेरे – ३५९
अकोला – १९५
अकोट – १६४
व्हिडिओ कॅमेरे – ३५
ड्रोन कॅमेरे – ४८
अस्का लाईट – १०
मेगाफोन/PA सिस्टीम – २२
नॉईज लेव्हल मीटर – २३
ब्रेथ अॅनालायझर – २१
रिफ्लेक्टर जॅकेट – २१
वॉच टॉवर्स – २४
लाईट बॅटन – ६०
जॅकेट – ६०
बॅरिकेड्स – २४०
ड्रोन व CCTVच्या माध्यमातून मिरवणुकीतील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी नॉईज लेव्हल मीटर आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी ब्रेथ अॅनालायझरचा वापर केला जाणार आहे.
DJ-डॉल्बीवर न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार DJ, डॉल्बी व तत्सम ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत निर्बंध लागू आहेत. याबाबत गणेश मंडळांना नोटिसा देण्यात आल्या असून DJ चालकांच्या पोलीस स्टेशननिहाय बैठका घेऊन नियमांची माहिती देण्यात आली आहे.
न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित गणेश मंडळ व DJ चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात BNS कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आले आहेत.
उत्साहासोबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन
गणेश विसर्जनाचा उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडताना नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेचे नियम पाळावेत, इतर धर्मीयांच्या भावनांचा आदर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
विसर्जनादरम्यान कोणतीही अडचण, संशयास्पद हालचाल किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तातडीने डायल ११२ वर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले.






