Home Breaking News मध्यरात्रीची शोधमोहीम; लोणारमध्ये अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध

मध्यरात्रीची शोधमोहीम; लोणारमध्ये अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध

 

चान्नी पोलिस व अकोला स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; तीन संशयितांसह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

 

श्रीकांत पाचकवडे 

 

अकोला : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी रात्रभर शोध घेत अखेर लोणार येथील घरकुलजवळील पट्टी परिसरातून सुरक्षित शोध घेतला. चान्नी पोलीस, अकोला स्थानिक गुन्हे शाखा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या समन्वयातून लोणारमध्ये ही कारवाई करण्यात आली.

 

या प्रकरणी २५ सप्टेंबर २०२६ रोजी चान्नी पोलीस ठाण्यात अप.क्र. ३४१/२०२६, कलम १३७(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी परिसरात आणि परिचितांकडे शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. मुलीला फूस लावून कोणीतरी घेऊन गेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला होता.

 

तपासाची चक्रे वेगाने फिरली

 

अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याने चान्नी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. उपलब्ध माहिती आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे संभाव्य ठिकाणांची माहिती घेण्यात आली. अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही तपासात सहभागी झाले.

 

लोणार व परतूर पोलिसांच्या मदतीने बुलढाणा परिसरातील संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिस पथके रात्रभर विविध ठिकाणी तपास करत होती. मिळणाऱ्या प्रत्येक माहितीची पडताळणी करून शोधमोहीम पुढे नेण्यात आली.

 

अखेर मुलगी लोणार येथील घरकुलजवळील पट्टी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात शोध घेत मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले. मुलगी सापडल्याची माहिती मिळताच तिच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला.

 

तीन संशयित ताब्यात

 

या प्रकरणात पोलिसांनी शांताराम अश्रू कराळे (४०, रा. लोणार), अनुसया गुणाजी साखरकर (४०, रा. वढव, लोणार) आणि चंद्रकला देविदास कोकाटे (५०, रा. आदर्श गोरक्षण संस्था, आलेगाव) यांना ताब्यात घेतले आहे.

 

तसेच मुलीला घेऊन जाण्याच्या घटनेत सहभागी असल्याचा संशय असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

दरम्यान, मुलीला नेल्यानंतर तिला कुठे आश्रय देण्यात आला, या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग होता का आणि संबंधितांना कोणी मदत केली का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. तपासातून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

परि. पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी चान्नी पोलीस ठाणे धनराज देवर्जनकर, अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच लोणार व परतूर पोलिसांच्या पथकाने शोधमोहीमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Don`t copy text!