Home Breaking News हृदयविकाराचा धक्क्याने पत्नींचा मृत्यू झाल्याचा बनाव : पोस्टमार्टममध्ये हत्येची पुष्टी होताच पती...

हृदयविकाराचा धक्क्याने पत्नींचा मृत्यू झाल्याचा बनाव : पोस्टमार्टममध्ये हत्येची पुष्टी होताच पती फरार  

हृदयविकाराचा धक्क्याने पत्नींचा मृत्यू झाल्याचा बनाव : पोस्टमार्टममध्ये हत्येची पुष्टी होताच पती फरार  

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भीमनगर परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केलीये. पतीने खोटा बनाव करत सुरुवातीला हृदयविकाराचा धक्का आल्याने आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, महिलेच्या कुटुंबियांना तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसल्या. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे पोस्टमार्टममध्ये हत्येची पुष्टी झाली. सध्या आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शीतल जॉन्सन मंडपे (३९ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. जॉन्सन मंडपे (४१) असे आरोपी पतीचे नाव आहे.

शीतल मंडपे आणि तिचा पती जॉन्सन मंडपे यांच्यात गेल्या सात वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे दोघे वेगवेगळे राहत होते. या दांपत्याला दोन लहान मुले आहेत. रात्री शीतल घरी एकटीच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जॉन्सनने शेजाऱ्यांना सांगितले की, तिचा मृत्यू रात्री हार्ट अटॅकने झाला. मात्र, शीतलचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यावर तिच्या शरीरावर ओरखडे, जखमा आणि गळा दाबल्याचे खुणा स्पष्ट दिसल्या. चादरीवर रक्ताचे डागही आढळले. शंका आल्याने शीतलच्या आई गौतमी चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ आकस्मिक मृत्यूची नोंद करत शवविच्छेदनासाठी मृतदेह एम्स रुग्णालयात पाठवला. प्राथमिक अहवालात शीतलच्या डोक्यावर, चेहऱ्यावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले. २८ मे रोजी प्राप्त अंतिम अहवालात हार्ट अटॅकचा कुठेही उल्लेख नसल्याने हत्या झाल्याची पुष्टी झाली.

पोलीस तपास सुरू होताच जॉन्सन मोटारसायकल घेऊन फरार झाला असून त्याचा मोबाईल फोनही बंद आहे. सध्या पोलीस आरोपीचे कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे त्याचा शोध घेत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांवरील अत्याचाराबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

Don`t copy text!