Home Breaking News कथित पत्रकाराचा भाईजान निघाला गांजा तस्कर ! म्हणे पोलिसांनीच ठेवला गांजा; ‘उलटा...

कथित पत्रकाराचा भाईजान निघाला गांजा तस्कर ! म्हणे पोलिसांनीच ठेवला गांजा; ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ची चर्चा

pimpalgaon raja police station

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी )बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा परिसरात झालेल्या एनडीपीएस कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या छाप्यात सुमारे ४ किलो गांजा जप्त केल्याचा दावा केला असून, या प्रकरणी मोहम्मद अतीक मोहम्मद शफीक (वय २९, रा. गुलजारपुरा, पिंपळगाव राजा, ता. खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, कारवाईत अडकलेली व्यक्ती स्वतःला पत्रकार म्हणून ओळख देत असल्याची चर्चा असून, कारवाईनंतर संबंधितांकडून पोलिसांवरच गंभीर आरोप करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामुळे परिसरात “उलटा चोर कोतवाला को डाटे” अशी चर्चा रंगू लागली आहे. कथित पत्रकाराचा भाईजान निघाला गांजा तस्कर अशी सुद्धा चर्चा आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २७ मे २०२६ रोजी रात्री गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळगाव राजा ते तरवाडी रोडवरील एका टिनपत्राच्या गोदामावर छापा टाकण्यात आला. पंच, महसूल व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ४ किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत अंदाजे २ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याशिवाय घटनास्थळावरून ४७ लहान-मोठ्या पोत्यांमध्ये साठवलेले २३ क्विंटल ६२ किलो तांदूळ जप्त करण्यात आले आहेत. हा तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्याबाबत स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) अधिनियम १९८५ च्या कलम ८(क), २०(ब) आणि २०(ब)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईनंतर संबंधित व्यक्तीकडून पोलिसांवर आरोप करण्यात येत असल्याची चर्चा असली, तरी याबाबत कोणतेही अधिकृत पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. दुसरीकडे, पोलिसांनी पंचांसमक्ष आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई केल्याचे नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, सत्य काय आहे याचा सखोल तपास करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. तसेच शासकीय यंत्रणांवर करण्यात आलेल्या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कथित पत्रकाराचा भाईजान निघाला गांजा तस्कर अशी सुद्धा चर्चा असून तो पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयन्त करत आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बर्वे यांच्याकडे सोपविण्यात आला असून तपास सुरू आहे.

Don`t copy text!