Home Breaking News गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा दणका; दोन दिवसांत 40 ठिकाणी धाड, 32 आरोपी...

गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा दणका; दोन दिवसांत 40 ठिकाणी धाड, 32 आरोपी अटकेत

Akola News

श्रीकांत पाचकवडे | अकोला

Akola News / अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच राज्यभरातील गुटखा माफियांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त पदार्थांच्या अवैध व्यापारावर कारवाई करत दोन दिवसांत राज्यातील 40 ठिकाणी धाड टाकण्यात आली. या मोहिमेत 32 आरोपींना अटक करण्यात आली असून 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 12.16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची गय नाही”

कारवाईनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका स्पष्ट करत आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधातील मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यात 19 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने विशेष कारवाई केली. पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 19 लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. काही आस्थापना आवश्यक परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्याचेही तपासात उघड झाले.

भ्रामक जाहिरातींवरही प्रशासनाची करडी नजर

गुटखा आणि भेसळखोरांविरोधातील मोहिमेबरोबरच ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही एफडीएने लक्ष केंद्रित केले आहे. उत्पादनांचे खोटे फायदे सांगून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या तसेच अशा जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या विभागात मुंढेंची एंट्री

गेल्या काही वर्षांत अन्न व औषध प्रशासन विभाग विविध आरोपांमुळे चर्चेत राहिला होता. अशा परिस्थितीत कठोर आणि पारदर्शक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. 25 मे 2026 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने धडक कारवायांना सुरुवात केली.

21 वर्षांची कारकीर्द, 25 बदल्या; तरीही कामाची तडफ कायम

2005 मध्ये प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सोलापूर, नागपूर, वाशिम, जालना, नवी मुंबई, पुणे, नाशिक, मुंबई तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांसारख्या विविध ठिकाणी त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. विशेष म्हणजे 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली होऊनही त्यांच्या कार्यशैलीतील तडफ कायम राहिली आहे.

जनतेकडून स्वागत, माफियांमध्ये धास्ती

मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या धडक मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे गुटखा माफिया, भेसळखोर आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. “आरोग्याशी तडजोड नाही” हा संदेश देत एफडीएच्या कारभाराला त्यांनी नवी दिशा दिल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे.

Don`t copy text!