Home राजकीय ‘प्रेम, प्रभाव आणि पैशांचा सापळा’; अकोल्यातील कथित ‘प्रेम कहानी’ ची राजकीय...

‘प्रेम, प्रभाव आणि पैशांचा सापळा’; अकोल्यातील कथित ‘प्रेम कहानी’ ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

उच्चशिक्षित महिलेपासून सुरू झालेली कहाणी पोहोचली सत्तेच्या दालनापर्यंत; मध्यस्थी, पैशांची मागणी आणि गुप्त बैठकींची रंगली चर्चा

🔹 ठळक मुद्दे

उच्चशिक्षित महिलेभोवती फिरणाऱ्या कथित प्रकरणाची शहरात चर्चा

प्रभावशाली लोकप्रतिनिधीचा स्वीय सहाय्यक आणि कंत्राटदार चर्चेच्या केंद्रस्थानी

नोकरीच्या आमिषातून वाढली जवळीक झाल्याची कुजबुज

आर्थिक व्यवहार आणि लाखोंच्या मागणीची चर्चा

मध्यस्थीच्या बैठकींनंतर वाद मिटल्याचा दावा

अधिकृत तक्रार किंवा शासकीय पुष्टी अद्याप नाही

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : प्रेमसंबंध, राजकीय प्रभाव, पैशांची ताकद आणि पडद्यामागील घडामोडींच्या चर्चांनी अकोल्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. अधिकृत पातळीवर कोणतीही तक्रार अथवा पुष्टी नसतानाही एका कथित प्रकरणाने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक वर्तुळात चर्चेचे वादळ निर्माण केले आहे.

चर्चेनुसार, या कथानकाची सुरुवात एका उच्चशिक्षित आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या महिलेपासून झाली. एका वैयक्तिक कामानिमित्त ती एका प्रभावशाली लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात गेली आणि तेथूनच या कथित घडामोडींना सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, संबंधित स्वीय सहाय्यकाने आपल्या राजकीय संपर्कांचे आणि प्रभावाचे भांडवल करत महिलेशी जवळीक वाढविली. तिच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, या कथित कथानकात शरदाच्या चांदण्या रात्री फुलवण्यात एका शासकीय कंत्राटदाराची एंट्री झाली. काही लोकप्रतिनिधींच्या जीवावर कोट्यावधीची कंत्राट घेऊन अल्पावधीत गळगंज पैसा कमावणारा हा कंत्राटदार आलिशान राहणीमान, आर्थिक बळ आणि प्रभावशाली वर्तुळातील वावरामुळे त्यानेही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते. त्यानंतर या तिघांमधील संबंध अधिक दृढ होत गेल्याची चर्चा राजकीय गल्लीबोळांत रंगू लागली.

सूत्रांच्या चर्चेनुसार, अकोला, मुंबई आणि काही खासगी फार्महाऊसपर्यंत या कथित संबंधांचा विस्तार होत गेला आणि शरदाच्या चांदण्या रात्री फुलवत गेल्या. काळ जसजसा पुढे गेला तसतशा या प्रकरणाच्या चर्चांनाही वेग आला. काही संवेदनशील घडामोडी घडल्याचे दावेही केले जात आहेत. मात्र या सर्व बाबींना कोणतीही अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही.

यानंतर कथानकाने अचानक नाट्यमय वळण घेतल्याची चर्चा आहे. संबंधित महिलेने अचानक भूमिका बदलल्याने या प्रकरणातील दोन्ही प्रभावशाली व्यक्ती अडचणीत आल्याचे बोलले जाते. पैशाच्या जोरावर कंत्राटदाराने स्वतःला या वादापासून दूर ठेवल्याची चर्चा असताना स्वीय सहाय्यक मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकत गेला.

२५ लाखांच्या मागणीची चर्चा; पडद्यामागे रंगली मध्यस्थी?

राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, एका मध्यस्थामार्फत तब्बल २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची कुजबुज आहे. या घडामोडींमुळे संबंधित स्वीय सहाय्यकाची चांगलीच धावपळ उडाल्याचे बोलले जाते.

प्रकरण अधिक चिघळत असल्याचे लक्षात येताच काही प्रभावशाली व्यक्तींनी मध्यस्थीची सूत्रे हातात घेतल्याची चर्चा आहे. अनेक बैठका, समेटाचे प्रयत्न आणि पडद्यामागील चर्चांनंतर अखेर हा वाद कमी रकमेवर मिटल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे.

सर्वाधिक फटका कोणाला?

या संपूर्ण कथित प्रकरणाचा सर्वाधिक फटका स्वीय सहाय्यकाला बसल्याचे बोलले जात आहे. पद, प्रतिष्ठा, प्रभाव आणि आर्थिक नुकसान अशा अनेक आघाड्यांवर त्याला परिणाम सहन करावा लागल्याची चर्चा आहे. तर त्याचा निकटवर्तीय मानला जाणारा कंत्राटदारही या वादानंतर पूर्णपणे शांत झाल्याचे सांगितले जाते.

महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण कथित प्रकरणासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार, पोलिस नोंद, न्यायालयीन प्रक्रिया किंवा शासकीय पुष्टी समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या या सर्व चर्चा केवळ राजकीय वर्तुळातील कुजबुज, सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि सामाजिक चर्चांच्या आधारेच सुरू आहेत.

अकोल्यात सध्या एकच प्रश्न चर्चेत…

“प्रेम, प्रभाव आणि पैशांच्या या कथित खेळात अखेर कोण जिंकला आणि कोण हरला?”

Don`t copy text!