Home राजकीय “माझ्या मुलाच्या भीतीने उमेदवारी अर्ज फेटाळला” – गोपीकिशन बाजोरिया

“माझ्या मुलाच्या भीतीने उमेदवारी अर्ज फेटाळला” – गोपीकिशन बाजोरिया

Akola News

श्रीकांत पाचकवडे

अकोला (Akola News): विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक नाट्य आता न्यायालयीन लढाईपर्यंत पोहोचले आहे. अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया Viplav Bajoria यांचा उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर माजी आमदार तथा शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया Gopikishan Bajoria यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“उमेदवारी फेटाळण्यामागे दबाव कोणाचा?”

प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना गोपीकिशन बाजोरिया यांनी थेट सवाल उपस्थित केला की, अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव होता? याच प्रकारचा अर्ज यापूर्वी अकोला आणि परभणी-हिंगोली मतदारसंघात स्वीकारण्यात आला होता, मग अमरावतीतच तो का फेटाळण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बाजोरिया म्हणाले, “अर्ज पूर्णपणे वैध होता”

“अर्जावर सही आणि शिक्का नसल्याचे कारण देण्यात आले, पण सर्व कागदपत्रे नियमांनुसार होती. त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्याची संधीही देण्यात आली नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर केला.”

“अमरावतीतील उमेदवार आमच्या उमेदवारीला घाबरले”

विप्लव बाजोरियांच्या उमेदवारीमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता होती, असा दावा करत गोपीकिशन बाजोरिया म्हणाले,
“मैदानात उतरून सामना झाला असता तर जनतेने निर्णय दिला असता. पण निवडणूक लढण्याची संधीच हिरावून घेण्यात आली.”

न्यायालयात लढाई; निवडणूक रद्द होण्याचा दावा

या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे सांगत त्यांनी दावा केला की,”न्यायालयातून १०० टक्के न्याय मिळेल. तसे न झाल्यास निवडणूक याचिकेत ही निवडणूक रद्द होऊ शकते.”

परभणी-हिंगोलीच्या जागेबाबत नाराजी नाही

परभणी-हिंगोली मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी पक्ष नेतृत्वावर कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.”पक्षश्रेष्ठींनी भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून निर्णय घेतला असेल. त्यांच्या निर्णयाचा मी आदर करतो.”

बाजोरिया पॅटर्नची पुन्हा चर्चा

गोपीकिशन बाजोरिया यांनी दावा केला की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांनी विकसित केलेल्या “बाजोरिया पॅटर्न”मुळे स्वतः तीन वेळा आणि मुलगा एकदा विधान परिषदेत निवडून आला. अमरावतीतही याच भीतीतून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

गोपीकिशन बाजोरिया यांची राजकीय वाटचाल ?

शिवसेनेचे सलग तीन कार्यकाळ विधान परिषदेचे आमदार.

अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून 2003 ते 2021 पर्यंत सलग 18 वर्षे प्रतिनिधित्व.

विधान परिषदेत पक्षाचे गटनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी.

सध्या शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते.

पुत्र विप्लव बाजोरिया हे 2018 मध्ये परभणी-हिंगोली मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून आले.

उमेदवारी अर्ज रद्द

संपत्तीचा तपशील देणारे प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याच्या कारणावरून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २ जून रोजी तब्बल साडेतीन तास चाललेल्या युक्तिवादानंतर विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद ठरवला.

Don`t copy text!