विकासाच्या ध्यासाला राष्ट्रीय स्तरावर मिळाली मान्यता; अकोला पश्चिमच्या जनतेला समर्पित केला सन्मान
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना ऑल इंडिया लूक लाईक असोसिएशनच्या वतीने प्रतिष्ठित ‘बेस्ट आमदार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीची आणि जनतेच्या प्रश्नांबाबतच्या संवेदनशील भूमिकेची दखल घेत हा बहुमान प्रदान करण्यात आला.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान (ज्युनिअर अनिल कपूर) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक, राजकीय आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला पश्चिम मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित अनेक प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्यांचा पाठपुरावा केल्याबद्दल आमदार पठाण यांची विशेष दखल घेण्यात आली. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी सातत्याने शासन स्तरावर प्रयत्न केले असून, अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.
मतदारसंघातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी त्यांनी विधानसभेत वेळोवेळी आवाज उठविला. तसेच अल्पसंख्याक समाजासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उर्दू घर प्रकल्पासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले, अशी माहिती कार्यक्रमात देण्यात आली.
पुरस्कार स्वीकारताना आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “हा सन्मान केवळ माझा नसून अकोला पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक नागरिक, कार्यकर्ता आणि मतदारांचा आहे. जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. आगामी काळात विकासकामांचा वेग आणखी वाढवून मतदारसंघाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मी अधिक जोमाने काम करणार आहे.”
त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विकासाला केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून साजिद खान पठाण यांची ओळख अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला अकोला गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव जावेद खान, माजी नगरसेवक मो. इरफान, नगरसेवक गुड्डू पठाण, जावेद जकारिया, हाजी मतीन, आर्किटेक्ट सोहेल खान, मंजूर अहमद, इकबाल सूर्या, रिजवान खान, सोहेल खान पठाण, सय्यद अहमद यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे आमदार साजिद खान पठाण यांच्या विकासकेंद्री नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावरील मान्यता मिळाल्याचे मानले जात असून, अकोला पश्चिमच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांना नवी प्रेरणा मिळाल्याची चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात रंगत आहे.
One attachment • Scanned by Gmail





