श्रीकांत पाचकवडे
अकोला : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीची समीकरणे काहीही असली तरी शिवसैनिकांनी प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची भक्कम संघटनात्मक ताकद उभी करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे ठाम आवाहन राज्याचे परिवहन मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे संपर्कमंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी केले. अकोला येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
शिवसेना अकोला जिल्ह्याच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजयभाऊ राठोड, आमदार तथा विभागीय नेते बच्चूभाऊ कडू, अकोला लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार डॉ. राजन साळवी, शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया, युवा सेना सचिव व लोकसभा संपर्कप्रमुख विठ्ठल सराफ पाटील, संपर्कप्रमुख संजनाताई गवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, श्रीरंग पिंजरकर, चंद्रशेखर पांडे, अश्विन नवले, उषाताई विरक, रेखाताई राऊत, महानगरप्रमुख राजेश मिश्रा, निशा ग्यारल आदी प्रमुख पदाधिकारी मंचावर विराजमान होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला लोकसभा संपर्कप्रमुख डॉ. राजन साळवी यांनी केले. त्यानंतर शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांनी संघटन विस्तार, जनसंपर्क आणि आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रताप सरनाईक यांनी पक्षसंघटना बळकट करण्यावर विशेष भर देत बूथस्तरापासून गाव, शहर आणि मतदारसंघ पातळीपर्यंत शिवसेनेचे जाळे अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याच कार्यक्रमात नवनियुक्त विभागीय प्रवक्ते प्रा. डवले यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण शिबिराला शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्हाभरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल यांनी केले, अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी दिली.





