Home महाराष्ट्र कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर; तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस उग्र निदर्शनांनी गाजला!

कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर; तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस उग्र निदर्शनांनी गाजला!

शेतकरी नेते रविकांत तुपकर
बस जळाली, टायर पेटले, एसडीओ कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलढाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न
श्रीधर ढगे
बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस राज्यभरातील उग्र निदर्शने, संतप्त प्रतिक्रिया आणि नाट्यमय घटनांनी गाजला. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या रात्रीपासून तिसऱ्या दिवसाच्या सायंकाळपर्यंत बुलढाणा जिल्ह्यासह विविध भागांत शेतकरी रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी आंदोलनाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून तुपकर यांच्या आंदोलनाचा वणवा आता गावोगावी पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.
 दुसऱ्या रात्रीच आंदोलनाचा उद्रेक; किनगाव जट्टूत एसटी बस जळाली
आंदोलनाच्या दुसऱ्या रात्री लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे एसटी बस जळाल्याची घटना घडली. पोलिस प्रशासनाकडून बस शॉर्टसर्किटमुळे पेटल्याचा दावा केला जात असला तरी ती बस आंदोलकांनीच पेटवली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन सतर्क झाले आहे.
पेठ पुलावर मध्यरात्री टायर जाळून निषेध
चिखली-खामगाव मार्गावरील पेठ येथील पुलावर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात आंदोलकांनी टायर पेटवून आंदोलन केले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
खामगावात एसडीओ कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
मध्यरात्री खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “सरसकट कर्जमुक्ती करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा आशयाचे फलक झळकवत शासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
जळगाव जामोदमध्ये तहसील कार्यालयावर चढले शेतकरी
तिसऱ्या दिवशी आंदोलनाला आणखी आक्रमक स्वरूप प्राप्त झाले. जळगाव जामोद येथे अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. हातात फलक घेऊन शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.अचानक उभारलेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
उदयनगरात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
चिखली तालुक्यातील उदयनगर येथे शेतकरी आंदोलकांनी थेट पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. कर्जमुक्ती आणि पीकविम्याच्या मागण्यांसाठी आंदोलकांनी टाकीवरून घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले.
 बुलढाण्यात आंदोलनाचा कळस; शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
दुपारी साडेदोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲड. शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले होते.
जिल्हाधिकाऱ्यांना सातबाऱ्याचे वाण देण्यासाठी ॲड .शर्वरी तुपकर शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अडवण्यात आलेल्या आंदोलकांनी संतप्त होत दूध, कांदे, टोमॅटो आणि विविध भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळातच संपूर्ण परिसर भाजीपाल्याने भरून गेला. याच दरम्यान अंत्री खेडेकर येथील विठ्ठल खेडेकर या तरुण शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला वेळीच ताब्यात घेतले आणि आगपेटी जप्त केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
चर्चा झाली… पण तोडगा नाही!
दरम्यान, शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार कुमरे, ठाणेदार संग्राम पाटील तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेत शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रमुख मागणीवर ठोस निर्णय होऊ शकला नाही. यावेळी तुपकर यांनी अधिकाऱ्यांसमोर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “केवळ चर्चा करून वेळकाढूपणा करण्याचा आणि आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न शासनाने करू नये. शेतकरी आता आश्वासनांचे डोस सहन करणार नाही. सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि इतर मागण्यांबाबत तातडीने शासन निर्णय काढावा,” अशी मागणी त्यांनी केली. “मला कोणत्याही प्रकारचा मान-सन्मान किंवा प्रसिद्धी नको. हा संघर्ष माझ्यासाठी नाही तर राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या हक्कांसाठी आहे. आता शब्द नकोत, निर्णय हवा; आश्वासने नकोत, न्याय हवा,” असेही ते म्हणाले. सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर त्याचे स्वागत केले जाईल; मात्र आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यव्यापी जनआंदोलन उभे राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यभरातून वाढता पाठिंबा; आंदोलनस्थळी विविध संघटनांची उपस्थिती
रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून शेतकरी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी बुलढाण्यात दाखल होत आहेत. आंदोलनस्थळी आंबेडकरी चळवळीचे नेते आशिष बाबा खरात, अखिल भारतीय किसान सभेचे प्रतिनिधी जितेंद्र चोपडे, सुनील चोपडे, कॉ. अनिल गायकवाड, माळेगाव परिसरातील शेतकरी, बुलढाणा जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, सुभाष करणतुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शेतकरी, युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीमुळे आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण असून संघर्षाला नवी ऊर्जा मिळत आहे.
शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद
 शिवजन्मभूमी जुन्नर-शिवनेरी येथून आलेल्या शेतकरी बांधवांनी आंदोलनस्थळी भेट देत रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीची पवित्र माती आणून तुपकर यांच्या कपाळी लावली. तसेच शेतकरी चळवळीचे प्रतीक असलेला आसूड भेट देत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा संदेश दिला.”शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद आणि शेतकरी बांधवांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. ही माती स्वाभिमान, संघर्ष आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते,” अशी भावना तुपकर यांनी व्यक्त केली.
 निर्णयाशिवाय माघार नाही!
अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस संपत असतानाही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही. दुसरीकडे राज्यभरातून वाढणारा पाठिंबा, विविध भागांतील आक्रमक आंदोलने आणि बुलढाण्यातील आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.”सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार. निर्णयाशिवाय माघार नाही,” अशी ठाम भूमिका रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
Don`t copy text!