Home Breaking News   Buldana : तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा राज्यभर; प्रकृती गंभीर, ठिकठिकाणी आंदोलनांना...

  Buldana : तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा राज्यभर; प्रकृती गंभीर, ठिकठिकाणी आंदोलनांना आक्रमक वळण

  Buldana
श्रीधर ढगे /  Buldana
बुलढाणा : शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक स्वरूप धारण केले आहे. एका बाजूला तुपकर यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली असताना दुसऱ्या बाजूला शासनाच्या भूमिकेविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून राज्यभर आंदोलनांचे पडसाद उमटत आहेत.
रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाण्यातील निवासस्थानी संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सलग चार दिवस अन्नत्याग केल्याने त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला असून वैद्यकीय तपासणीत रक्तातील साखरेची पातळी ५० च्या खाली गेल्याचे समोर आले आहे. अशक्तपणा, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी आणि थकवा वाढल्याने समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तुपकर यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असतानाही शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करत राज्यभर शेतकरी आक्रमक झाले आहेत. वाशिम येथे संतप्त शेतकऱ्यांनी अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

  Buldana
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक स्वरूप धारण केले
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उभी असलेली शासनाची टाटा सुमो जाळण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मेहकर आणि हिवरा आश्रम परिसरात तलाठी कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुरादपूर येथील टोल नाका पेटविल्याचा प्रकार घडल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातही आंदोलनाची धग पोहोचली. आंदोलकांनी कार्यालय परिसरात फटाक्यांची लड फोडून निषेध नोंदवला. अचानक झालेल्या स्फोटक आवाजामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी संबंधित आंदोलकाला ताब्यात घेतले.
रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर ॲड. शर्वरी तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात हार घालून गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. दुसरीकडे मलकापुरात शेतकरी आंदोलकांनी विहिरीत उतरून जलसमाधी आंदोलन केले.
तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा प्रभाव आता बुलढाण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. तुपकर यांची प्रकृती अधिक खालावल्यास आणि शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता बुलढाण्यातील घडामोडींवर लागले आहे.
Don`t copy text!