खामगाव : शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या विभागीय केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणारे समाधान उद्धवराव जाधव यांची खामगाव तालुक्यातील भालेगाव येथे समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
समाधान जाधव यांनी विभागीय स्तरावरील मर्यादित स्पर्धा परीक्षेत यश मिळवत केंद्रप्रमुखपदासाठी पात्रता प्राप्त केली. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा अनुभव, प्रशासकीय क्षमता आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांची भालेगाव केंद्रप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून शिक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शाळांच्या विकासासाठी केलेल्या योगदानामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भालेगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासह प्रशासन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रासह सामाजिक व राजकीय स्तरातून समाधान जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मित्रमंडळी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.





