श्रीकांत पाचकवडे
अकोला : शिवसेना ही केवळ चार अक्षरांची संघटना नसून सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारी एक व्यापक चळवळ आहे. अकोला जिल्ह्यात शिवसेना मोठ्या ताकदीने वाढत असून भविष्यात जनतेचा विश्वास संपादन करणारा पक्ष म्हणून अधिक बळकट होईल, असा विश्वास शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे यांनी व्यक्त केला.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख अश्विनभाऊ नवले, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, जिल्हाप्रमुख मंगेश काळे, महिला सेना जिल्हाप्रमुख उषाताई विरक, जिल्हा समन्वयक डॉ. अशोक ओळंबे तसेच महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांना ललितभाऊ वानखडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना अश्विनभाऊ नवले म्हणाले की, शिवसैनिक हा नेहमी सर्वसामान्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी संघर्ष करण्यास सज्ज असला पाहिजे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणे हीच शिवसैनिकांची खरी ओळख आहे.
माजी आमदार तथा नवनियुक्त जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर यांनी “गाव तेथे शाखा, शाखा तेथे बूथ प्रमुख” ही संघटनात्मक संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. तर चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नामदार एकनाथराव शिंदे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना अकोला जिल्ह्यात उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात जिल्ह्यातून अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवनियुक्त जिल्हा समन्वयक डॉ. अशोक ओळंबे यांनी पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल आणि कार्यकर्ता व नेतृत्व यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याची ग्वाही दिली.
महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांनी “वॉर्ड तेथे बूथ प्रमुख” ही संकल्पना महानगरात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक बूथवर सक्षम शिवसैनिक उभा राहावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला प्रा. प्रकाश डवले, संतोष अनासने, योगेश अग्रवाल, माजी नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती अनिल मालगे यांनी दिली.





