Home Health अकोल्यात कालबाह्य तुपावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ५९३ किलो साठा...

अकोल्यात कालबाह्य तुपावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ५९३ किलो साठा जप्त

दोन आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित; तब्बल १४.१५ लाखांचा साठा कारवाईच्या कक्षेत

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने अकोला शहरात धडक कारवाई केली. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत दोन आस्थापनांमध्ये कालबाह्य तुपाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले. दोन्ही ठिकाणांहून तब्बल ५९३ किलो कालबाह्य तूप जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत १४ लाख १५ हजार ९३ रुपये आहे.

 

१६ सप्टेंबर रोजी पूर्वा मार्केटिंग येथे कारवाई

 

आदर्श कॉलनीयेथील पूर्वा मार्केटिंग या आस्थापनाची तपासणी केली असता १५ विविध प्रकारच्या कालबाह्य तुपाचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळले. प्रशासनाने हा संपूर्ण साठा जप्त केला. जप्त तुपाचे वजन ४५८ किलो, तर त्याची अंदाजे किंमत ३ लाख ३४ हजार ९३ रुपये आहे.

 

लीलाधर जगजीवन येथेही कालबाह्य तूप आढळले

 

त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी लीलाधर जगजीवन या प्रतिष्ठान अकोला येथे तपासणी करण्यात आली. यावेळी Vatula Premium Ghee या खाद्यपदार्थाचा कालबाह्य साठा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळले. प्रशासनाने १३५ किलो तूप, अंदाजे ८१ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला.

 

दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित

 

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५९३ किलो कालबाह्य तूप जप्त करण्यात आले आहे. जप्त साठ्याची एकूण अंदाजे किंमत १४,१५,०९३ रुपये असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले. तसेच दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

 

जप्त करण्यात आलेल्या कालबाह्य खाद्यपदार्थांबाबत नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

 

ही कारवाई सह आयुक्त (अन्न), अमरावती विभाग एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अकोला येथील सहाय्यक आयुक्त (अन्न) डी. गो. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. सोळंके आणि कि. ह. बोरचाटे यांनी केली.

 

कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री किंवा साठवणूक ही ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब असून, अशा प्रकारांविरुद्ध प्रशासनाकडून पुढील काळातही तपासणी व कारवाई केली जाणार आहे.

Don`t copy text!