Home Breaking News तेल्हारा परिसरातील विद्युत तार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस

तेल्हारा परिसरातील विद्युत तार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तिघे आरोपी ताब्यात, ८.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : तेल्हारा परिसरात विद्युत अॅल्युमिनियम तार चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असताना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावत तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून ५४५ किलो विद्युत अॅल्युमिनियम तार आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप असा एकूण ८ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

अकोला जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तेल्हारा पोलीस ठाण्यात दाखल विद्युत तार चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला.

 

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा

 

तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे विद्युत तार चोरी करणाऱ्या टोळीचा माग काढला. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२६ रोजी पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

 

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये सै. मुजम्मील सै. जहाँगीर (३६, रा. परळी वैजनाथ, जि. बीड), फारुख खान आसिफ खान (२६, रा. तारफैल, अकोला) आणि अब्दुल शरीक अब्दुल जब्बार (३५, रा. मेहबूब नगर, नायगाव, अकोला) यांचा समावेश आहे.

 

तीन गुन्ह्यांची उकल

 

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी साथीदारांच्या मदतीने तेल्हारा परिसरात विद्युत अॅल्युमिनियम तार चोरीचे तीन गुन्हे केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये तेल्हारा पोलीस ठाण्यातील अपराध क्रमांक १९४/२०२६, २८३/२०२६ आणि ३५४/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

 

चोरी केलेल्या तारा वाहून नेण्यासाठी बोलेरो पिकअप वाहनाचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

५४५ किलो तार, बोलेरो पिकअप जप्त

 

या कारवाईत पोलिसांनी ५४५ किलो विद्युत अॅल्युमिनियम तार, अंदाजे किंमत २ लाख ७२ हजार ५०० रुपये, तसेच एमएच ०१ सीआर ११३६ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप, किंमत अंदाजे ६ लाख रुपये, असा एकूण ८ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

या कारवाईमुळे तेल्हारा परिसरातील विद्युत तार चोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल झाली असून, या टोळीशी संबंधित अन्य गुन्हे व साथीदारांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

 

यांनी केली कारवाई

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली स्था.गु.शा. येथील अधिकारी निलेश देशमुख, गोपाल जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण, अनिल चव्हाण व पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, सुलतान पठाण, फिरोज खान, भारकर धोत्रे, अमीत दुबे, अब्दुल माजिद, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, खुशाल नेमाडे, मंगेश इंगळे, वसीमोद्दीन, एजाज अहमद, राहुल गायकवाड, स्वप्नील खेडकर, श्रीकांत पातोंड, अन्सार अहमद, राज चंदेल, आकाश मानकर, धिरज वानखडे, पवन डांबलकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, सतिश पवार, अशोक सोनवणे, भिमराव दिपके तसेच चालक विनोद ठाकरे, प्रविण कश्यप, रामकिसन डोईफोडे, मनिष ठाकरे, देवानंद खरात, प्रकाश लोखंडे यांनी केली आहे.

Don`t copy text!