शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; सरकार खंबीरपणे पाठीशी – आमदार रणधीर सावरकर
श्रीकांत पाचकवडे
अकोला : नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. संकटाच्या काळात सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” अशी माहिती विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत. त्याच अनुषंगाने ते ३ ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय पथकाकडूनही परिस्थितीची पाहणी सुरू असून, राज्य सरकारकडून पंचनामे करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला देण्यात आल्याचे सावरकर यांनी सांगितले.
असा आहे महसूल मंत्र्यांचा दौरा
सकाळी ९ वाजता : अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्किट हाऊस येथे निवेदने स्वीकारणार.
सकाळी १० वाजता : येवता, ता. अकोला येथे शेताच्या बांधावर जाऊन पाहणी.
सकाळी ११ वाजता : बाळापूर तालुक्यातील मानकी येथे भेट.
सकाळी ११.३० वाजता : पारस विश्रामगृह येथे बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारणार.
शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती, कोरड्या दुष्काळाचे परिणाम, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा तसेच शासनाकडून अपेक्षित उपाययोजना याबाबत आपल्या मागण्या व भावना लेखी स्वरूपात मांडाव्यात, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाध्यक्ष जयंत मसने, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.
“शेतकऱ्यांच्या अडचणी आणि भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी ३ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपल्या मागण्या लेखी स्वरूपात द्याव्यात. महायुती सरकार संकटकाळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.






