विना परवाना, विना नंबर आणि ओव्हरलोड वाहनांवर कारवाई; १९ वाहनांवर दंडात्मक कार्यवाही, ₹४२,५०० दंड वसूल
श्रीकांत पाचकवडे
अकोला : शहरासह महामार्गांवर वाढणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांना लगाम घालण्यासाठी अकोला जिल्हा व शहर वाहतूक शाखेने गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत धडक मोहीम राबविली. या कारवाईत विना परवाना, विना नंबर प्लेट, ओव्हरलोड तसेच अपूर्ण कागदपत्रांसह धावणाऱ्या हायवा आणि टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक आर्चीत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरातील प्रमुख चौक तसेच महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली.
गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात हायवा आणि जड टिप्पर बेदरकारपणे तसेच वेगाने चालविले जात असल्याच्या तक्रारी वाहतूक शाखेला प्राप्त होत होत्या. काही वाहनांकडे वैध परवाने व आवश्यक कागदपत्रे नसणे, नंबर प्लेट नसणे अथवा अस्पष्ट नंबर प्लेट असणे, तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाळू, मुरूम व अन्य बांधकाम साहित्याची वाहतूक होत असल्याचेही निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटेपासूनच विविध ठिकाणी नाकाबंदी करून अवजड वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.
कारवाईत आढळलेले प्रमुख नियमभंग
विना परवाना अवजड वाहनांची वाहतूक
नंबर प्लेट नसलेली अथवा नियमबाह्य नंबर प्लेट असलेली वाहने
क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक
ताडपत्रीचा वापर न करणे
चालकासोबत क्लीनर नसणे
आवश्यक वैध कागदपत्रे सोबत न बाळगणे
या विशेष मोहिमेत एकूण १९ हायवा व टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनांकडून एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या काही वाहनांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी स्पष्ट आहे.






