Home Breaking News अकोल्यात १,९०० किलो संशयित मिठाईचा साठा जप्त; ५.७२ लाखांचा माल नष्ट करणार

अकोल्यात १,९०० किलो संशयित मिठाईचा साठा जप्त; ५.७२ लाखांचा माल नष्ट करणार

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : गोपनीय माहितीच्या आधारे अकोला महानगरपालिकेच्या अन्न सुरक्षा विभागाने सोमवारी (५ ऑक्टोबर) रायलीजिन येथील Arco Transport येथे छापा टाकून अहमदाबाद, गुजरात येथून आलेला अस्वच्छ व आरोग्यास घातक परिस्थितीत वाहतूक केलेला तब्बल १,९०० किलो मिठाईचा साठा जप्त केला. या साठ्याची अंदाजे किंमत ५ लाख ७२ हजार रुपये आहे.

 

अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने सकाळी ११.३० वाजता तपासणी केली असता अहमदाबाद येथून MP 09 HQ 5004 आणि MH 28 AB 7882 या ट्रकद्वारे विविध ब्रँडची मिठाई अयोग्य व अस्वच्छ परिस्थितीत वाहतूक केल्याचे आढळून आले.

 

जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये अंबिका स्वीट हलवा, GWAL ट्रेडिशनल स्वीट, श्री ग्वाल हलवा, अंबिका रिच स्वीट, ब्रजनिधी स्वीट आणि मुरलीधर स्वीट या पदार्थांचा समावेश आहे.

 

या अन्नपदार्थांचे नियमानुसार नमुने घेण्यात आले असून, उर्वरित १,९०० किलो साठा अकोला महानगरपालिकेच्या भोड येथील बायोगॅस प्रकल्पातील SWM Processing Plant मध्ये नष्ट करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, सदर मिठाईचा साठा मागविणाऱ्या कमल शर्मा, वैभव पाटील आणि अशोक अहुजा यांच्या परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावतीचे सहआयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला महानगरपालिकेचे सहायक आयुक्त देवानंद वीर आणि अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली.

 

अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थांची वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Don`t copy text!