संजय साखरे महाराज यांनी मोबाईल पोलिसांकडे केला जमा; खामगाव शहर पोलिसांच्या मध्यस्थीने मोबाईलची मालकिणीपर्यंत सुखरूप पोहोच
OTT NEWS
खामगाव : शहरात प्रामाणिकपणाचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारी घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली. डॉ. भावना बाकल यांचा रस्त्यावर हरवलेला मोबाईल एका नागरिकाला सापडल्यानंतर त्यांनी तो स्वतःकडे न ठेवता थेट खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे हा मोबाईल अखेर त्याच्या मालकिणीला सुरक्षितपणे परत मिळाला.
डॉ. भावना बाकल या दुपारी आपल्या हॉस्पिटलमधून ऑटोने घरी जात असताना थेटे हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर त्यांचा मोबाईल खाली पडला. काही वेळाने याच मार्गावरून मोटारसायकलने जात असलेले मोरे संकुल परिसरातील रहिवासी संजय साखरे महाराज यांच्या निदर्शनास हा मोबाईल आला.
मोबाईल सापडल्यानंतर त्यातील वैयक्तिक माहितीचा गैरवापर करण्याऐवजी साखरे महाराज यांनी तत्काळ खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठले आणि मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला.
यानंतर खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र अहेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. भावना बाकल यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचा हरवलेला मोबाईल सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आला.
हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने डॉ. भावना बाकल यांनी संजय साखरे महाराज यांच्या प्रामाणिकपणाबद्दल तसेच खामगाव शहर पोलिसांच्या तत्परतेबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.
आजच्या काळात मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर ती प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे उदाहरण संजय साखरे महाराज यांनी घालून दिले आहे. त्यांच्या या कृतीचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.






