Home Breaking News अकोला जिल्ह्यात पाणीटंचाईचा भडका; प्रशासनाच्या दिरंगाईवर शिवसेना आक्रमक!

अकोला जिल्ह्यात पाणीटंचाईचा भडका; प्रशासनाच्या दिरंगाईवर शिवसेना आक्रमक!

 

 

ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करा, अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन छेडणार : जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांचा इशारा

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अकोला जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे हाल होत असून, अनेक भागांत पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी दिला.

 

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी वेळेत उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाकडून प्रभावी कार्यवाही होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

 

कागदोपत्री नियोजन नको, प्रत्यक्ष उपाययोजना करा!

 

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेनेने वारंवार केली होती. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

 

 

कार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब

 

शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, संजय भाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता साळुंखे यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत उपाययोजनांमधील दिरंगाईबाबत जाब विचारण्यात आला.

 

पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर कराव्यात आणि नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

“प्रशासनाने पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागणे दुर्दैवी आहे. प्रशासनाने दिरंगाई सुरूच ठेवल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा गोपाल दातकर यांनी दिला.

Don`t copy text!