‘एफएफएस’ प्रणाली लागू होणार; खतांचा काळाबाजार आणि अनियंत्रित साठेबाजीला आळा बसण्याची अपेक्षा
श्रीकांत पाचकवडे
अकोला : शेतकऱ्यांना खत खरेदी करणे अधिक सोपे व्हावे आणि खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी अकोला जिल्ह्यात २२ ऑक्टोबरपासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) या नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाइल ॲपच्या माध्यमातून खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ही माहिती दिली.
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता अकोल्यासह राज्यातील आणखी २३ जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
क्यूआर कोड स्कॅन करून खतांचे बुकिंग
नव्या व्यवस्थेनुसार शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून खतांचे बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील खत विक्रीही या प्रणालीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या नव्या प्रणालीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाकडून गावपातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे. सहायक कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बैठका घेऊन शेतकऱ्यांना खत बुकिंग, वितरण आणि ॲपच्या वापराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
खतांचा काळाबाजार रोखण्यावर भर
खत विक्रीतील अनियमितता, काळाबाजार आणि अनियंत्रित साठेबाजीला आळा घालणे हा या प्रणालीचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी खत विक्रेत्यांकडील ई-पॉस (e-POS) मशीन कार्यरत असणे बंधनकारक राहणार आहे.
तसेच विक्री केंद्रावरील प्रत्यक्ष खतसाठा आणि ई-पॉस मशीनमध्ये नोंदवलेला साठा यांची पडताळणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष साठा आणि ऑनलाइन नोंदी यामध्ये तफावत आढळू नये, यासाठीही लक्ष दिले जाणार आहे.
एकूणच, एफएफएस प्रणालीमुळे खत खरेदी आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्याबरोबरच खतांचा योग्य पुरवठा सुनिश्चित करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.






