Home Breaking News डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या नियुक्तीने काँग्रेसला संघटनात्मक बळ : डॉ. सुधीर ढोणे

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या नियुक्तीने काँग्रेसला संघटनात्मक बळ : डॉ. सुधीर ढोणे

 

 

सपकाळ यांच्या कार्यशैलीशी साधर्म्य; तळागाळापासून बूथपातळीपर्यंत संघटन मजबूत होण्याची अपेक्षा

 

श्रीकांत पाचकवडे

 

अकोला : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तळागाळातून तसेच पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून आपली राजकीय वाटचाल केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संघटनात्मक कामाचा अनुभव असलेले डॉ. सिरिवेल्ला प्रसाद महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्त झाल्याने पक्षाच्या संघटन विस्ताराला आणखी गती मिळेल, असे डॉ. ढोणे यांनी सांगितले.

 

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद हे आंध्र प्रदेशातील अर्थतज्ज्ञ असून काँग्रेसमध्ये त्यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तामिळनाडू आणि झारखंडचे सहप्रभारी म्हणून त्यांनी काम केले असून, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

 

विविध राज्यांतील संघटनात्मक कामाचा अनुभव

 

डॉ. ढोणे म्हणाले की, विविध राज्यांतील संघटनात्मक कामाचा डॉ. प्रसाद यांना अनुभव आहे. पक्षाच्या विविध स्तरांवर समन्वय साधण्याची क्षमता आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा अनुभव त्यांच्या नव्या जबाबदारीत महत्त्वाचा ठरेल.

 

काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मक पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद, संघटन कौशल्य आणि स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा आढावा यांना महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रसाद यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून झालेली नियुक्ती महत्त्वाची असल्याचे डॉ. ढोणे यांनी नमूद केले.

 

जिल्हा ते बूथपातळीपर्यंत संघटन मजबूत करण्यावर भर

 

महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्हा, तालुका आणि बूथपातळीवरील संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद वाढविणे, संघटनात्मक कामाचा आढावा घेणे तसेच विविध विभाग व आघाडी संघटनांमध्ये समन्वय वाढविण्याची जबाबदारीही डॉ. प्रसाद यांच्यावर राहणार आहे.

 

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संघटनात्मक कामाला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास डॉ. सुधीर ढोणे यांनी व्यक्त केला.

Don`t copy text!