श्रीकांत पाचकवडे
अकोला : शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अकोला जिल्ह्यात महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.
अकोला जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विन नवले यांची शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघांसाठी चंद्रशेखर पांडे गुरुजी, तर अकोट विधानसभा मतदारसंघासाठी मंगेश काळे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी नगरसेविका सौ. उषा विरक यांची नियुक्ती करण्यात आली असून राजेश मिश्रा यांची महानगरप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय तथा पुष्पलता भाऊराव मोरे यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयातून या नियुक्त्या जाहीर केल्या.
नियुक्त पदाधिकाऱ्यांनी हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार-प्रसार करत धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीप्रमाणे संघटन विस्तारासाठी कार्य करावे आणि सर्वांना सोबत घेऊन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करावेत, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्त्यांमुळे अकोला जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात पक्ष विस्ताराला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, अशी माहिती शिवसेना पदाधिकारी अनिल मालगे यांनी दिली.





