अकोला | श्रीकांत पाचकवडे
शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने अकोला पोलीस दलाने ‘मिशन उडान’ उपक्रमांतर्गत ‘फिट इंडिया अभियान 2026’ची सुरुवात केली. गुरुवारी पोलीस मुख्यालय परिसरात आयोजित योग व ध्यान सत्रात पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
योगासने आणि प्राणायामाचे महत्त्व पटवून दिले
सकाळी आयोजित सत्रात योग प्रशिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते तसेच दैनंदिन जीवनातील तणाव कमी करण्यासाठीही योग उपयुक्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ध्यानाद्वारे मानसिक आरोग्याचा संदेश
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले. ध्यानाच्या माध्यमातून मनःशांती, एकाग्रता आणि तणावमुक्त जीवनशैली कशी साध्य करता येते याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. सहभागी नागरिकांनी प्रत्यक्ष ध्यानाचा अनुभव घेत मानसिक स्वास्थ्य जपण्याचा संदेश स्वीकारला.
पुढील तीन दिवस विविध फिटनेस उपक्रम
‘फिट इंडिया अभियान 2026’ अंतर्गत पुढील काही दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जून रोजी झुंबा फिटनेस सत्र, ६ जून रोजी स्किपिंग स्पर्धा व प्रात्यक्षिके, तर ७ जून रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अकोला पोलीस दलाने केले आहे.
निरोगी समाजासाठी सामूहिक प्रयत्न
‘फिट इंडिया – निरोगी भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरत असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आणि नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.






