काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झुंज देत मातृभूमीसाठी दिले सर्वोच्च बलिदान; अकोला जिल्ह्याचा अभिमान उंचावला
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील सुपुत्र तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रसेवेसाठीच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल देशातील दुसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार असलेला ‘कीर्ती चक्र’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन येथे आयोजित भव्य रक्षा अलंकरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्म Droupadi Murmu यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्यामबाला जंजाळ आणि आई शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा गौरवशाली पुरस्कार स्वीकारला. या भावनिक क्षणी संपूर्ण सभागृहाने त्यांच्या शौर्याला मानवंदना दिली.
या सोहळ्यास उपराष्ट्रपती सी. पी . राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शेवटच्या श्वासापर्यंत दिली शौर्याची लढत
६ जुलै २०२४ रोजी काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या दहशतवादविरोधी शोध मोहिमेदरम्यान शिपाई प्रवीण जंजाळ आपल्या तुकडीसह कार्यरत होते. मोहिमेदरम्यान काही संशयास्पद हालचाली त्यांच्या निदर्शनास आल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांना सतर्क केले. याचवेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पळून जाण्याच्या उद्देशाने अंधाधुंद गोळीबार सुरू केला.
अत्यंत प्रतिकूल आणि जीवघेण्या परिस्थितीतही प्रवीण जंजाळ यांनी अदम्य धैर्य, शौर्य आणि प्रसंगावधान दाखवत दहशतवाद्यांचा पाठलाग केला. आपल्या अचूक आणि प्रभावी गोळीबारातून त्यांनी दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकीदरम्यान त्यांच्या डोक्याला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. मात्र, गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी लढा थांबवला नाही. अखेर मातृभूमीच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देत त्यांनी वीरमरण पत्करले.
अकोला जिल्ह्याचा अभिमान
शिपाई प्रवीण जंजाळ यांच्या अतुलनीय शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रासाठीच्या सर्वोच्च बलिदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ जाहीर केले. त्यांच्या या पराक्रमामुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या शौर्यगाथेने नव्या पिढीसमोर देशसेवा आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.





