Home महाराष्ट्र किलकारी आरोग्य योजना ठरतेय माता-बालकांसाठी आरोग्याची जीवनरेषा

किलकारी आरोग्य योजना ठरतेय माता-बालकांसाठी आरोग्याची जीवनरेषा

किलकारी आरोग्य योजना
श्रीकांत पाचकवडे
अकोला : माता आणि बालकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी ‘किलकारी मोबाईल आरोग्य योजना’ हजारो कुटुंबांसाठी आरोग्यविषयक माहितीचा विश्वासार्ह आधार बनत आहे. गर्भधारणेपासून ते बालकाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत आवश्यक असलेले आरोग्य मार्गदर्शन आता थेट मोबाईलवर उपलब्ध होत असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळत आहे.
या योजनेअंतर्गत नोंदणीकृत गर्भवती महिलांना आणि नवजात बालकांच्या पालकांना आठवड्यातून एकदा स्वयंचलित व्हॉइस कॉलद्वारे महत्त्वपूर्ण आरोग्य माहिती दिली जाते. गर्भधारणेदरम्यान घ्यावयाची काळजी, सुरक्षित प्रसूती, नवजात शिशूची निगा, स्तनपानाचे महत्त्व, लसीकरण, पोषण आणि कुटुंब नियोजन यासारख्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन या कॉलमधून उपलब्ध होते.
विशेष बाब म्हणजे लाभार्थ्यांना मिळणारे संदेश त्यांच्या स्थानिक भाषेत, मराठीसह विविध भाषांमध्ये असतात. तसेच गर्भधारणेचा टप्पा आणि बालकाचे वय लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती माहिती दिली जाते. त्यामुळे योग्य वेळी योग्य सल्ला मिळून माता व बालकांच्या आरोग्य संरक्षणाला बळकटी मिळत आहे.
मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे आणि ग्रामीण भागातील महिलांपर्यंत आरोग्यविषयक माहिती सहज पोहोचविणे हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत आशा सेविका, एएनएम किंवा आरसीएच पोर्टलवर गर्भवती महिलेची नोंदणी झाल्यानंतर तिचा मोबाईल क्रमांक प्रणालीमध्ये समाविष्ट केला जातो. त्यानंतर नियमितपणे आरोग्यविषयक मार्गदर्शनाचे कॉल सुरू होतात. ही सेवा पूर्णपणे मोफत असून लाभार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
“किलकारी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेने घ्यावा. योजनेत नाव नोंदविण्यासाठी आशा सेविका किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा,” असे आवाहन जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी बाळासाहेब घुगे यांनी केले आहे.
ठळक वैशिष्ट्ये
गर्भवती महिला व एक वर्षापर्यंतच्या बालकांच्या पालकांसाठी योजना
आठवड्यातून एकदा मोबाईलवर मोफत व्हॉइस कॉल
मराठीसह स्थानिक भाषांमध्ये आरोग्य मार्गदर्शन
गर्भधारणेच्या टप्प्यानुसार व बालकाच्या वयानुसार माहिती
प्रसूती, स्तनपान, लसीकरण, पोषण व कुटुंब नियोजनाबाबत सल्ला
माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रभावी उपक्रम
लाभार्थ्यांसाठी सेवा पूर्णपणे विनामूल्य
‘किलकारी’च्या एका फोन कॉलमधून माता आणि बालकांच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वाची माहिती घरबसल्या उपलब्ध होत आहे.
Don`t copy text!