अकोला तालुक्याने घरगणनेत जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक
श्रीकांत पाचकवडे
अकोला : जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील घरगणनेचे काम जिल्ह्यात सर्वप्रथम पूर्ण करण्याचा मान अकोला तालुक्याने मिळविला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते तहसीलदार कुणाल झाल्टे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील एकूण ३७६ गणना गटांमध्ये घरगणनेचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. नियोजित मुदतीपूर्वी हे काम पूर्ण करून अकोला तालुक्याने जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तहसीलदार कुणाल झाल्टे तसेच घरगणनेच्या कार्यात सहभागी संपूर्ण प्रशासनिक चमूचे अभिनंदन केले. आगामी जनगणना प्रक्रियेसाठीही त्यांनी शुभेच्छा देत याच तत्परतेने काम करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजेंद्र मालठाणे तसेच जनगणना विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






