Home विदर्भ काटेपूर्णा धरणात २३ टक्केच जलसाठा; पाणीटंचाईचे संकट गडद , उबाठाचे जिल्हाप्रमुख गोपाल...

काटेपूर्णा धरणात २३ टक्केच जलसाठा; पाणीटंचाईचे संकट गडद , उबाठाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची प्रशासनाकडे धाव

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : पावसाने गेल्या ४५ दिवसांपासून दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील धरणांच्या जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. अकोला जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या काटेपूर्णा (महान) प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उबाठाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केली आहे.

 

दातकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय नावंदर आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे यांच्याशी चर्चा केली.

 

काटेपूर्णा (महान) प्रकल्पातून अकोला शहरासाठी दरवर्षी २४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. याशिवाय मुर्तीजापूर शहरासह अकोला तालुक्यातील ६४ गावांना ‘६४ खेडी खांबोरा’ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून याच प्रकल्पावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे काटेपूर्णा धरणातील घटता जलसाठा हा केवळ अकोला शहराचा प्रश्न नसून शहरासह अनेक गावांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.

 

धरणात सध्या केवळ २३ टक्के पाणीसाठा असल्याने पावसाने आणखी विलंब केल्यास उपलब्ध साठ्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे, तसेच पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी दातकर यांनी केली.

 

दगडपारवा प्रकल्पातून जलवाहिनीचा प्रस्ताव

‘६४ खेडी खांबोरा’ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी दगडपारवा धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी दातकर यांनी केली आहे. दगडपारवा ते सुकळी दरम्यान सन २००९ मध्ये अंथरण्यात आलेली जलवाहिनी अनेक ठिकाणी क्षतीग्रस्त झाली आहे. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता ही जलवाहिनी नव्याने अंथरण्याचा प्रस्ताव युद्धपातळीवर शासनाकडे सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

“अकोला शहरासह मुर्तीजापूर आणि ६४ गावांचा पाणीपुरवठा काटेपूर्णा प्रकल्पावर अवलंबून आहे. संभाव्य दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन प्रशासनाने विलंब न करता उपाययोजना सुरू कराव्यात.”

— गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख, उबाठा

Don`t copy text!