Home Breaking News निःस्वार्थ गौसेवा, रक्तसेवा अन् रुग्णसेवेची दखल; सुरजभैय्या यादव यांचा जिल्हास्तरीय सन्मान

निःस्वार्थ गौसेवा, रक्तसेवा अन् रुग्णसेवेची दखल; सुरजभैय्या यादव यांचा जिल्हास्तरीय सन्मान

 

१४ वर्षांपासून देशभरात सेवाकार्य; अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यशाळेत गौरव

 

खामगाव | प्रतिनिधी

 

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे निःस्वार्थ सामाजिक सेवाकार्य करणारे सुरजभैय्या यादव यांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात आयोजित कार्यशाळा व सन्मान सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

 

सुरजभैय्या यादव यांनी गेल्या १४ वर्षांपासून देशभरात गौसेवा, रक्तसेवा, रुग्णसेवा आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न न राहता निःस्वार्थ भावनेने समाजसेवा करण्याच्या त्यांच्या कार्याची या वेळी दखल घेण्यात आली.

 

यादव हे एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक असून महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तसेच, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रक्तमित्र आणि गौसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे.

 

यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजू घाटे (पाटील) यांनी सुरजभैय्या यादव यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “सुरजभैय्या यादव हे प्रसिद्धीसाठी नाही, तर प्राणीमात्रांच्या वेदनांसाठी जगतात. म्हणूनच त्यांनी केलेल्या सेवाकार्याची ओळख आज संपूर्ण भारतात आहे.”

 

या सन्मान सोहळ्याला तहसीलदार पवन पाटील, कृषी अधिकारी रमेश जाधव, गटविकास अधिकारी सुधाकर वायाळ यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

निःस्वार्थ सेवेला मिळालेली दाद

 

गौसेवा, रक्तदानासाठी मदत आणि रुग्णसेवेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविणाऱ्या सुरजभैय्या यादव यांच्या कार्याचा जिल्हास्तरीय सन्मानाच्या माध्यमातून गौरव करण्यात आला. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींना अशा उपक्रमांतून प्रोत्साहन मिळते, अशी माहिती प्रदीप शमी यांनी दिली.

Don`t copy text!