बोलेरोसह ७ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त; तस्कर पोलिसांच्या रडारवर
श्रीकांत पाचकवडे
अकोला Akola News : गोवंशांची चोरी, अवैध वाहतूक आणि कत्तलीच्या उद्देशाने होणाऱ्या तस्करीला आळा घालण्यासाठी अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहर विभागाच्या पोलिसांनी तेलीपुरा चौक परिसरात कारवाई करत ८ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत तस्करीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा बोलेरो आणि गोवंश असा एकूण ७ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
दि. १३ सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या पथकाला रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलीपुरा चौक परिसरात गोवंशांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या परवानगीने रामदासपेठ पोलिस आणि आरसीपी प्लाटूनच्या मदतीने परिसरात छापा टाकण्यात आला.
या कारवाईत MH-30-AA-3494 क्रमांकाची महिंद्रा बोलेरो आढळून आली. वाहनासह परिसरात ८ गोवंश अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयपणे कोंबून ठेवलेल्या अवस्थेत सापडले. काही जनावरे जखमी अवस्थेत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
जखमी गोवंशांना उपचारासाठी हलविले
पोलिसांनी तत्काळ सर्व गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. नियमानुसार त्यांच्या उपचाराची व देखभालीची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी कारवाईपूर्वीच फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत पोउपनि. रत्नदिप पळसपगार, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद नदिम, प्रफुल्ल बांगर, तसेच रामदासपेठ पोलीस ठाण्याचे सुरेश लांडे, रोशन पटले, संतोष सुराशे, आरसीपी-०३चे पथक प्रमुख विजय दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.






