खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा, अटाळी, उमरा भिसे, अकोलीसह विविध गावांत प्रत्यक्ष पाहणी; तातडीने पंचनाम्यांचे निर्देश
खामगाव (OTT News Network ):खामगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके सुकत चालली असून अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
पिकांचे नुकसान किती झाले आहे, याचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावेत, असे निर्देश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई आणि पीकविम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या निवेदनानंतर प्रश्न मंत्र्यांपर्यंत
३१ ऑगस्ट रोजी शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांना निवेदन देऊन ई-केवायसी तसेच पावसाने दडी मारल्यामुळे सुकत चाललेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती. तालुक्यातील सुमारे ७० टक्के पिके पाण्याअभावी सुकून वाया जाण्याची परिस्थिती असल्याची माहिती मंत्री जाधव यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली.
दौरा सोडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
यावेळी मंत्री जाधव हे दिल्ली, उत्तराखंडमधील देहरादून आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता दौऱ्यावर होते. मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी दौऱ्यातून परतल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली, असा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांना धीर
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना दिली. प्रत्येक गावातील परिस्थितीची माहिती घेऊन नुकसानभरपाईसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या गावांमध्ये झाली पाहणी
खामगाव मतदारसंघातील टेंभुर्णा, अटाळी, उमरा भिसे, अकोली, बोरी अडगाव, कदमापूर, दस्तापूर, शहापूर, वाहळा-कंचनपूर, शिर्ला नेमाने आदी गावांमध्ये सुकत चाललेल्या खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
“सरकार आपल्या पाठीशी” – शेतकऱ्यांना दिलासा
हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांसमोर सुकत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या परिस्थितीत प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सामान्य कार्यकर्त्यांचे फोनही ऐकून घेण्याचा दावा
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे सामान्य कार्यकर्त्यांचे फोन उचलून त्यांच्या समस्या ऐकून घेतात आणि दर शनिवार-रविवारी जनता दरबाराच्या माध्यमातून त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात, असा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. नैसर्गिक आपत्ती, आरोग्यविषयक प्रश्न किंवा इतर संकटांच्या काळात ते तातडीने मदतीला धावून येतात, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना पत्र लिहून बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी सांगितले.
“अफवांवर विश्वास ठेवू नका” – राजेंद्र बघे
शिवसेना खामगाव तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव तालुक्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून थोडा वेळ वाट पाहावी. बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा सुरू असून लवकरच निर्णय होईल,” असे राजेंद्र बघे यांनी सांगितले.
पदाधिकारी व अधिकारी उपस्थित
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषराव डिवरे, अमोल अंधारे, उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, गजानन धोरण, तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल फेंरग यांच्यासह महसूल व कृषी विभागातील अधिकारी, शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.






