मॉडिफाइड सायलेन्सरविरोधात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम तोडणाऱ्यांवर कारवाई
श्रीकांत पाचकवडे
अकोला : बुलेटचा सायलेन्सर बदलून रस्त्यावर फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करत धावणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही. नागरिकांची शांतता भंग करणाऱ्या आणि ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरविरोधात शहर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात विविध भागांत वाहनांची तपासणी सुरू आहे. या कारवाईत विशेषतः सायलेन्सरमध्ये फेरफार केलेल्या बुलेटवर पोलिसांचे लक्ष आहे.
मुद्दाम मोठा आवाज करणाऱ्यांवर नजर
शहरातील रस्ते, प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद बुलेट थांबवून सायलेन्सरची तपासणी केली जात आहे. अॅक्सिलरेटर वाढवून मुद्दाम मोठा आवाज करणे, फटाक्यांसारखे आवाज काढणे किंवा वाहनात नियमबाह्य बदल करणे आढळल्यास संबंधित वाहनचालकावर नियमानुसार कारवाई केली जात आहे.
अशा कर्णकर्कश आवाजामुळे केवळ ध्वनिप्रदूषण वाढत नाही, तर पादचारी व इतर वाहनचालक दचकण्याची शक्यता असते. विशेषतः रात्रीच्या वेळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
‘बुलेट आहे म्हणून काहीही करता येणार नाही!’
मॉडिफाइड सायलेन्सरच्या माध्यमातून रस्त्यावर दहशत निर्माण करण्याचा किंवा आवाजाची हौस भागविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. ‘बुलेट आहे म्हणून काहीही करता येते’ या मानसिकतेला आळा घालण्यासाठी तपासणी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे.
वाहनधारकांनी कंपनीचा मूळ सायलेन्सर कायम ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे. आवाजाचा थरार दाखविण्यापेक्षा सुरक्षित आणि जबाबदार वाहनचालक होण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
“बुलेटचा आवाज वाढविण्यासाठी सायलेन्सरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर आमची नजर आहे. मुद्दाम मोठा आवाज करणारी मॉडिफाइड बुलेट आढळल्यास वाहन थांबवून तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.” — विलास पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

पोलिसांचा स्पष्ट इशारा
मॉडिफाइड सायलेन्सर बसवून नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेटस्वारांनी वेळीच सावध व्हावे. ही कारवाई केवळ एक-दोन दिवसांची नसून नियमितपणे सुरू राहणार आहे.






