गणेशोत्सवाला सेवाभावाची जोड; कृषी महाविद्यालयात रक्तदानाचा जाग
श्रीकांत पाचकवडे
अकोला : गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड देत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, अकोला येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि कृषीविद्या गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१७ NSS स्वयंसेवकांनी रक्तदान करून माणुसकीची नाळ जपली. विशेष म्हणजे महिला स्वयंसेविकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे रक्तदानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान अधोरेखित झाले.
४४व्यांदा रक्तदान; डॉ. जेऊघाले यांचा आदर्श
शिबिरातील विशेष ठरलेला क्षण म्हणजे प्रा. डॉ. गिरीश जेऊघाले यांचे ४४वे रक्तदान. सातत्याने रक्तदान करत सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. जेऊघाले यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व कृतीतून दाखवून दिले.
शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील वैद्यकीय पथक उपस्थित होते. संकलित रक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत जमा करण्यात आले असून, ते गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरणार आहे.
मार्गदर्शनातून उपक्रमाला यश
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि NSS कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिल खाडे यांच्या विशेष प्रयत्नांतून शिबिर यशस्वी झाले.
यावेळी प्रा. डॉ. गिरीश जेऊघाले, प्रा. डॉ. दिलीप धुळे, प्रा. डॉ. संतोष दिवेकर, प्रा. प्रीती तोडासम आणि प्रा. डॉ. गोदावरी गायकवाड यांची उपस्थिती होती.
“उत्सवातून आनंद, सेवेतून समाधान”
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून “उत्सवातून आनंद आणि सेवेतून समाधान” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला. रक्ताचा एक थेंब गरजू रुग्णासाठी जीवनदायी ठरू शकतो, ही जाणीव समाजात रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.






