Home Breaking News Akola LCB : १६० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, ३५० किमी पाठलाग केला अन्...

Akola LCB : १६० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, ३५० किमी पाठलाग केला अन् बुलेट चोर पकडला!

चार जिल्ह्यांतून आरोपीचा माग काढत अकोला एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; ८० हजारांची बुलेट जप्त

श्रीकांत पाचकवडे
अकोला (Akola LCB)   : रामदासपेठ परिसरातून चोरीला गेलेल्या बुलेटचा शोध घेण्यासाठी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल १६० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा माग काढत पोलिसांनी अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर अशा चार जिल्ह्यांत सुमारे ३५० किलोमीटरचा पाठलाग केला. अखेर भद्रावती येथे कारवाई करून एका १८ वर्षीय तरुणासह विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत चोरीची बुलेट जप्त केली.

रामदासपेठ पोलीस ठाण्यात १० सप्टेंबर रोजी बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. रामदासपेठ परिसरातील पार्किंगमधून एमएच ३० एएक्स ००११ क्रमांकाची काळ्या रंगाची बुलेट, अंदाजे ८० हजार रुपये किमतीची, अज्ञात चोरट्याने लंपास केली होती.

सीसीटीव्हीने दिला चोरट्याचा ‘रूट’

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

फुटेजच्या आधारे चोरीची बुलेट अकोला रेल्वे स्टेशन, सिव्हिल लाईन चौक, महाकाली चौक, शिवणी, कुरणखेड टोलनाका या मार्गाने पुढे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिचा माग मूर्तिजापूर, लोणी, अमरावती आणि वर्धा मार्गे चंद्रपूरच्या दिशेने गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

तांत्रिक तपासातून आरोपीची ओळख

सीसीटीव्ही फुटेजसोबत गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाची जोड देत पोलिसांनी संशयित आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर एलसीबीचे पथक तातडीने भद्रावती येथे रवाना झाले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुजल रितेश आनंदवार (वय १८, रा. पंचशील नगर, चांदिका वॉर्ड, भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीची बुलेट जप्त करण्यात आली.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

बुलेट चोरीचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर आरोपींकडून आणखी वाहनचोरीचे गुन्हे उघड होतात का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास रामदासपेठ पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे, सपोनि गोपाल जाधव, पो.उप.नि.विष्णु बोडखे, पो.उप.नि. माजीद पठाण, पोलीस अंमलदार सुलतान पठाण, अमीत दुबे, रविंद्र खंडारे, किशोर सोनोने, महेंद्र मलिये, वसिमोद्दीन, मंगेश इंगळे, पवन डंबलकर, सतीश पवार चालक विनोद ठाकरे यांनी केली आहे.

पथकाने केली.

ठळक मुद्दे :

🔹 १६० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी

🔹 चार जिल्ह्यांत सुमारे ३५० किमीचा माग

🔹 ८० हजारांची चोरीची बुलेट जप्त

🔹 १८ वर्षीय संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

🔹 इतर वाहनचोरीच्या गुन्ह्यांचाही तपास सुरू

 

Don`t copy text!