कुशल भगत
अकोट : पावसाने दीर्घ खंड दिल्याने अकोट तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने अडगाव बु. येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
“पुढील १० दिवसांत शासनाने मागण्यांची दखल घेतली नाही, तर संपूर्ण अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन उभारू,” असा इशारा शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
🔸 कोरडा दुष्काळ जाहीर करा : पावसाअभावी सोयाबीनला दाणे भरले नसून कापूस व तुरीची पिके करपली आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी.
🔸 स्मार्ट मीटरची मनमानी थांबवा : महावितरणकडून स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करत ही प्रक्रिया तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली.
🔸 रंभापूर–वारखेड रस्त्यावर दुभाजक उभारा : या मार्गावरील अपघातांचा धोका लक्षात घेता रस्त्याचे आवश्यक रुंदीकरण करून गावांच्या ठिकाणी दुभाजक उभारावेत, अशी मागणी करण्यात आली.
🔸 वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा : पिकांचे नुकसान करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा.
‘१० दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा चक्का जाम!’
“शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने दहा दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर गावोगावी जनजागृती करून संपूर्ण अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा कौठकर यांनी दिला.
आंदोलनात दिनेश देऊळकार, निलेश नेमाडे, अमोल मसुरकार, रामकिशोर थुटे, नरेंद्र मानकर, रितेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, मनमोहन व्यास यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार राणे आणि हिवरखेडचे ठाणेदार सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.






