Home विदर्भ चोहोट्टा बाजारात अवैध देशी दारूविरोधात दहीहांडा पोलिसांचा धडाका

चोहोट्टा बाजारात अवैध देशी दारूविरोधात दहीहांडा पोलिसांचा धडाका

दोन कारवायांत २४८ क्वॉर्टर जप्त; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

 

कुशल भगत

अकोट : जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘प्रहार’ मोहिमेअंतर्गत दहीहांडा पोलिसांनी चोहोट्टा बाजार परिसरात अवैध देशी दारूविक्री व वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली. दोन स्वतंत्र कारवायांत २४८ देशी दारूचे क्वॉर्टर जप्त करून दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

पहिल्या कारवाईत चोहोट्टा चौकी परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक व्यक्ती चोहोट्टा येथून करतवाडीच्या दिशेने देशी दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी करतवाडी रोडवरील बजरंगबली मंदिरासमोर नाकाबंदी केली.

यावेळी डोक्यावर नॉयलॉनची पोतडी घेऊन येणाऱ्या सुरज मनोहर तायडे (३२, रा. रोहणा, अकोला) याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे ९० एमएल क्षमतेचे १०० देशी दारूचे क्वॉर्टर, अंदाजे ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. परवाना नसल्याने दारू जप्त करून कलम ६५(ई) अन्वये कारवाई करण्यात आली.

दुसऱ्या कारवाईत चोहोट्टा येथील आठवडी बाजारातील गादी कारखान्याजवळ एक व्यक्ती देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी कारवाई करत अंबादास देविदास चेचरे (४२, रा. चोहोट्टा बाजार, ता. अकोट) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या नॉयलॉन पोतडीची झडती घेतली असता १४८ क्वॉर्टर देशी दारू, अंदाजे ७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

या दोन्ही कारवायांत मिळून २४८ क्वॉर्टर आणि सुमारे १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात दहीहांडा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील आणि ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद अंबादास गोलाईत, पोहेकॉ विजय चव्हाण, पोकॉ सोमनाथ पिंपरे व पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Don`t copy text!