शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक विलास पाटील यांचे स्वागत; नियमपालनाचे आवाहन
श्रीकांत पाचकवडे
अकोला : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी बस स्टँड ऑटो युनियनने वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांचे गुलदस्ता देऊन स्वागत केले.
सणांच्या काळात शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढत असल्याने वाहतूक कोंडी तसेच अपघात टाळण्यासाठी ऑटोचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
युनिफॉर्मचा वापर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आणि शालेय विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून ऑटोचालकांना देण्यात आल्या. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न घेणे, वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी ऑटो न थांबवणे आणि पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे, यावरही भर देण्यात आला.
दरम्यान, आगामी सण-उत्सवांच्या काळात वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध ठेवण्यासाठी ऑटो युनियनकडून पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि ऑटोचालकांच्या समन्वयातून शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.






