श्रीकांत पाचकवडे
अकोला : शहरातील खड्डेमय रस्ते आणि निकृष्ट कामांबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच नव्याने झालेल्या काँक्रीट रस्त्यांवरील भेगांची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
माजी मंत्री आमदार बच्चू कडू, उपनेते गोपीकिसन बाजोरिया, जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख राजन साळवी, जिल्हा विशेष प्रभारी ललित वानखडे आणि जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली, महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली.
बाळापूर टी-पॉइंट ते रेल्वे गेट रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात
बालापूर टी-पॉइंट ते रेल्वे गेट तसेच अन्नपूर्णा माता मंदिरासमोरील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेनेने केली.
नव्या काँक्रीट रस्त्यावर भेगा; कामाच्या दर्जावर प्रश्न
रिधोरा ते शिवरदरम्यान नुकत्याच झालेल्या काँक्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. नवीन रस्त्याला अल्पावधीतच तडे गेल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांनी, “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी शिवसेना सातत्याने संघर्ष करीत राहील, असे सांगितले.
आठवडाभरात खड्डे बुजविण्याचे आश्वासन
शिवसेनेच्या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी एका आठवड्यात संबंधित रस्त्यांवरील खड्डे बुजवून आवश्यक दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मंगेश काळे, डॉ. ओळंबे, संतोष अनासने, विकी बावरी, फिरोज पठाण, पवनेश अग्रवाल, गजानन बोराडे, प्रकाश वानखडे, योगेश ढोरे, किरण ठाकूर, प्रणव तायडे, आशिष सोनवणे, कुणाल शिंदे, महेश बगेरे, अंकुश शिंत्रे, गोटू अग्रवाल, अभिषेक मिश्रा, किरण शिरसाट, आकाश शिरसाट, विजय तळेकर, समर्थ शर्मा, किरण राजुरकर, देवदास बोदळे, तुषार इंगळे, विशाल धोटे, रितेश दुबे, पंकज बाजोळ, विश्वासराव शिरसाट, बालू चव्हाण, मधु सोनारगण, सतीश देशमुख, ललित पांडे, संजय अग्रवाल, प्रतीक मानेकर, रवी मळावी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







