श्रीकांत पाचकवडे / Akola News
अकोला : अकोट तालुक्यातील अकोलखेड येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला अटक करून ४ लाख २० हजार ६०० रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अकोलखेड येथील रहिवासी देवानंद मधुकर फरकाडे यांच्या बंद घरात १० जून २०२६ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती. चोरट्याने घराच्या आवारातून आत प्रवेश करून स्टोअररूमची खिडकी फोडली, किचन व बेडरूमचे कुलूप तोडले आणि लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यातील घरफोडी व चोरीचे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याच्या पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रवी उर्फ नारायण रामदास डाबेराव (वय ३६, रा. गणेशनगर, चोहट्टा बाजार, ता. अकोट) याने ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोहट्टा बाजार परिसरातून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले दागिने वितळवून तयार केलेली २६.२४० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड (किंमत ४ लाख ४ हजार रुपये) तसेच ६४ ग्रॅम वजनाचा चांदीचा गोळा (किंमत १६ हजार ६०० रुपये) असा एकूण ४ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी अकोट ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष देशमुख, गोपाल जाधव, उपनिरीक्षक माजिद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चोहट्टा बाजार पोलीस चौकीचे अंमलदार विनोद गोलाईत यांनीही आरोपीला ताब्यात घेण्यास सहकार्य केले.
अवघ्या काही दिवसांत घरफोडीचा उलगडा करून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.





