एकीकृत चर्मकार समाजाच्या विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
श्रीकांत पाचकवडे / Akola News
अकोला : अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात एकीकृत चर्मकार समाजाच्या विविध संघटनांनी बुधवारी (दि. १८ जून) निवासी जिल्हाधिकारी, अकोला यांच्यामार्फत राज्य व केंद्र शासनाला निवेदन सादर केले.
अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, खडकी येथे दि. ६ जून रोजी उपवर्गीकरण विरोधातील राज्यव्यापी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात राज्यभरातील ५९ अनुसूचित जातींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. परिसंवादात अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या विषयावर सखोल व सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली.
या परिसंवादाला माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव पुरण मेश्राम, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संदेश वाघ, तसेच प्रा. डॉ. गणेश बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
परिसंवादात व्यक्त झालेल्या जनभावनांच्या आधारे राज्य शासनाला निवेदन सादर करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रपती, मुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री तसेच प्रधान सचिव (समाजकल्याण) यांच्या नावे हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी, अकोला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
मुख्य संयोजक प्रा. डॉ. गणेश बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी आप्पा डांबरे, प्रा. गजानन पद्मने, ॲड. शेषराव गव्हाळे, रामदास शेगोकार, मधुसूदन गव्हाळे, डॉ. जया वजीरे, विजय नरवाडे, अमोल भटकर आणि प्रा. अविनाश शिरसागर यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील मागण्या संबंधित शासनस्तरावर तातडीने पाठविण्यात येतील, अशी ग्वाही निवासी जिल्हाधिकारी यांनी यावेळी प्रतिनिधींना दिली.





