थॅलेसेमिया, सिकलसेल व रक्तदान जनजागृतीतील कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल; १५ राज्यांतील रक्तदूतांची उपस्थिती
खामगाव : एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांना मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील आई बगलामुखीच्या पवित्र भूमीवर वसलेल्या नलखेडा येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘चक्रवर्ती सम्राट अशोक रक्तयोद्धा सन्मान 2026’ प्रदान करण्यात आला.
आई बगलामुखी धाम, नलखेडा येथील सरस्वती शिशु विद्या मंदिरात रक्तदान महादान मित्र मंडळाच्या वतीने भव्य राष्ट्रीय रक्तदाता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, गुजरात, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा (हैदराबाद), आसाम, सिक्कीम आणि हरियाणा अशा देशातील १५ राज्यांतील रक्तदूतांनी सहभाग घेतला.
थॅलेसेमिया आणि सिकलसेल जनजागृतीतील कार्याची दखल
या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सुरजभैय्या यादव यांना थॅलेसेमिया, सिकलसेल तसेच रक्तदान जनजागृती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आई बगलामुखी मंदिरापासून रक्तदान जनजागृती रॅलीने झाली. तिरंगा झेंडा आणि देशभक्तीपर गीतांमुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले. त्यानंतर बैजनाथ ब्लड बँक, आगर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
‘हा सन्मान प्रत्येक रक्तदात्याचा’
या सन्मान सोहळ्याला एकनिष्ठा फाऊंडेशनचे सहकारी गोपाल सायखेडे आणि उमेश पांडे उपस्थित होते.
यावेळी सुरजभैय्या यादव यांनी, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून खामगावसह देशातील प्रत्येक रक्तदात्याचा आहे,” अशी भावना व्यक्त केली.
या संदर्भातील माहिती सोमेश वराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.






