कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजारांची नुकसानभरपाई देण्याची मागणी
श्रीकांत पाचकवडे
अकोला : जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, अकोला जिल्ह्यातील सर्व तालुके तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शत्रुघ्न बिरकड यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे अकोला दौऱ्यावर आले असता, जनता बाजारसमोरील शासकीय विश्रामगृह परिसरात त्यांची भेट घेऊन बिरकड यांनी निवेदन सादर केले. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने आनेवारीत मोठी घट झाली असून, पिकांच्या उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे बिरकड यांनी निवेदनात नमूद केले.
दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी प्रति हेक्टरी ७० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठोस मागणीही त्यांनी केली. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीच्या निकषांनुसार तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल अध्यक्ष विनोद कोगदे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद मिरगे, अखिल भारतीय समता परिषद अध्यक्ष गजानन म्हैसनै, सचिव गजेंद्र काळे, सतीश राठोड, चक्रधर राऊत, महेश राठोड, हिम्मत पवार, गौरव चव्हाण, तुषार राठोड, डिंगाबर उगले आदी उपस्थित होते.






