वंचित बहुजन युवा आघाडीच्या मध्यस्थीला यश; प्रशासनाकडून शेतरस्ता लवकर मोकळा करण्याचे लेखी आश्वासन
राजेश पल्हाडे
वाडेगाव : अडीच वर्षांपासून बंद असलेला शेतरस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी सागद येथील शेतकऱ्यांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले होते. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर वंचित बहुजन युवा आघाडीच्या मध्यस्थीने आणि प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली.
शेतरस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अडीच वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असूनही ठोस तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली होती. अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
उपोषणाची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष सुगतभाऊ डोंगरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थी केली. त्यानंतर तहसीलदार वैभव फरतारे, पोलीस स्टेशनचे ठाणेदार झोडगे आणि गटविकास अधिकारी दीपक सवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी शेतकऱ्यांनी आपली भूमिका प्रशासनासमोर ठामपणे मांडत अडीच वर्षांपासून बंद असलेला शेतरस्ता तातडीने मोकळा करून देण्याची मागणी केली. प्रशासनाच्या वतीने शेतरस्ता लवकरात लवकर मोकळा करून देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना ज्यूस पाजून आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपोषणकर्ते शेतकरी
सुधाकर तायडे, अनिल भारसाकडे, भगवान उमरावते, गुलाबराव इंगळे, प्रकाश दामोदर, नागेश गवारगुरु, एकनाथ कराळे, संपत भारसाकडे आणि रामेश्वर तायडे यांचा उपोषणात सहभाग होता.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष सुगतभाऊ डोंगरे, नागेश वानखडे, अमर खंडारे, युवराज डोंगरे, विजय पातोडे, महादेव कराळे आणि गजानन कराळे यांची उपस्थिती होती.
आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले असले तरी आता प्रशासन शेतरस्त्याचा प्रश्न प्रत्यक्षात किती लवकर मार्गी लावते, याकडे सागद परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






