Home विदर्भ संग्रामपूर तहसीलसमोर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन; दुष्काळी मदतीसाठी बैलगाडी पेटवली

संग्रामपूर तहसीलसमोर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन; दुष्काळी मदतीसाठी बैलगाडी पेटवली

 

प्रशांत डिक्कर यांचा इशारा; “न्याय न मिळाल्यास मंत्र्यांच्या गाड्या पेटवू”

 

संग्रामपूर | प्रतिनिधी

 

बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, कापूस आणि सोयाबीन पिकांचे झालेले नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर स्वराज्य पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी पेटते सोयाबीन टाकून बैलगाडी पेटवून शासनाचा निषेध नोंदवला.

 

“शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या”

 

यावेळी बोलताना प्रशांत डिक्कर यांनी सरकारच्या धोरणांवर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

“आज आम्ही बैलगाडी पेटवून शासनाचा निषेध नोंदवला आहे. शेतकऱ्यांना तातडीने न्याय आणि आर्थिक मदत मिळाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला.

 

हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी

 

दुष्काळग्रस्त आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच शेतमजुरांच्या प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याची मागणी करण्यात आली.

 

याशिवाय सरसकट कर्जमाफी करावी आणि प्रलंबित पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 

शेतकऱ्यांमध्ये संताप

 

दुष्काळामुळे कापूस, सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

 

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा स्वराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आला.

 

या आंदोलनात स्वराज्य पक्षाचे उज्वल चोपडे, विठ्ठल वखारे, मोहन पाटील, शिवम ईसापुरे, विशाल चोपडे, अमोल मारोडे, गौरव जळमकार, गणेश मानखैर, तुकाराम पाटील, गजानन आमझरै, विजय काळपांडे, नानाराव अरबट, विलास तराळे, धनंजय कोरडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

Don`t copy text!