शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चातून राज्य सरकारला इशारा; हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी
श्रीकांत पाचकवडे | अकोला
अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात पावसाने दीड महिन्याहून अधिक काळ दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. शासनाने कोणत्याही अटी-निकषांशिवाय तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अन्यथा ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग बंद करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी राज्य सरकारला दिला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान
अकोला जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत पावसाने मोठी दडी मारल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसह विविध पिकांचे नुकसान झाल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले. हाताशी आलेला पिकांचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवर टीका केली. संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका
शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आमदार नितीन देशमुख यांच्यासह अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, बुलढाण्याचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, ज्येष्ठ नेते सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आदींनी मोर्चाला संबोधित केले.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
शिवसेनेच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये—
1. तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.
2. पीकविम्यातील पूर्वीचे चार ट्रिगर पूर्ववत करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ द्यावा.
3. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावीत.
4. सिंचनाची सुविधा असलेल्या भागांत कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी २४ तास कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.
5. नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.
6. कर्जाचे पुनर्गठन केलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा.
7. जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा किंवा आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात.
स्वराज्य भवनातून निघाला आक्रोश मोर्चा
आक्रोश मोर्चाला स्वराज्य भवनाच्या प्रांगणातून सुरुवात झाली. मोर्चा शहीद मदनलाल धिंग्रा चौक, मध्यवर्ती बसस्थानक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने काही काळ शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मोर्चाला संबोधित केल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
भगवे झेंडे आणि सुकलेल्या सोयाबीनमधून शेतकऱ्यांचा आक्रोश
मोर्चाच्या मार्गावर भगवे झेंडे आणि विविध बॅनर लावण्यात आले होते. बॅनरच्या माध्यमातून दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांची परिस्थिती मांडण्यात आली. बैलगाड्यांवर प्रमुख नेते सहभागी झाले होते. दिंडीच्या गजरात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.
अनेक पुरुष आणि महिला शेतकऱ्यांनी हातात सुकलेले सोयाबीन घेऊन पिकांच्या नुकसानीकडे शासनाचे लक्ष वेधले.
‘उद्योगपतींचे कर्ज माफ; शेतकऱ्यांची उपेक्षा’
मागील बारा वर्षांच्या कालावधीत केंद्र व राज्य सरकारने अनेक बड्या उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित झाला की विविध अटी व निकष लावले जातात, असा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला.
पीक कर्जाची सक्तीने वसुली केली जात असून कर्जाची रक्कम जमा न केल्यास शेतकऱ्यांना बँकिंग व्यवहारांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले. सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
मोर्चात ज्येष्ठ नेते सेवकराम ताथोड, माजी आमदार संजय गावंडे, संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, विदर्भ संपर्क संघटिका सागरताई पुरी, संपर्क संघटिका वैशाली घोरपडे, जिल्हा संघटिका प्रा. माया म्हैसने, डॉ. सरिता वाकोडे, प्रा. संतोष हुसे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, दिलीप बोचे, योगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपुते, चंदू तिवारी, अतुल पवनीकर, संजय शेळके, भूषण भिरड, बबलू देशमुख, शहरप्रमुख आशिष गावंडे, राहुल कराळे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, ज्ञानेश्वर गावंडे, अविनाश गावंडे, संजय भांबेरे, सौरभ वाघोडे, गजानन मानतकर, गजानन चौधरी, रवी मुर्तडकर, शहरप्रमुख विनायक गुल्हाने, आनंद बनचरे, निरंजन बंड, मनोज खंडारे, उमेश राऊत, संगीता राठोड, कल्पना राहाटे, शुभांगी भटकर, चैताली लांडे, वर्षा पिसोडे आदी उपस्थित होते.






