अतिक्रमण हटवा, पण गरीब विक्रेत्यांचे नुकसान
श्रीकांत पाचकवडे
अकोला : शहर अतिक्रमणमुक्त असावे, रस्ते व पादचारी मार्ग नागरिकांसाठी मोकळे राहावेत, याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र अतिक्रमण हटविताना गरीब हातगाडीधारक, फळ-भाजी विक्रेते आणि छोट्या व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने हातगाड्या तोडण्यात आल्याचे तसेच फळे, भाजीपाला आणि अन्य विक्रीचा माल फेकण्यात आल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रोजच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे जकरिया यांनी म्हटले.
आधी सूचना, नंतर कारवाई
अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यकच आहे. मात्र संबंधितांना पूर्वसूचना देऊन, नियमानुसार दंड आकारून आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अतिक्रमण हटवावे. कारवाई करताना हातगाड्या तोडणे किंवा विक्रीयोग्य मालाची नासधूस करणे टाळावे, अशी मागणी त्यांनी केली.
“अतिक्रमणाला आमचा विरोध नाही. मात्र अतिक्रमण हटविताना एखाद्या गरीब कुटुंबाचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ नये. प्रशासनाने कारवाई करताना नियमांसोबतच मानवी दृष्टिकोनही ठेवावा,” असे जावेद जकरिया यांनी स्पष्ट केले.
बाजारवसुली आणि अतिक्रमण धोरण स्पष्ट करा
महानगरपालिकेकडून काही बाजारपेठांमध्ये व्यवसायासाठी शुल्क अथवा बाजारवसुली केली जाते. त्यामुळे बाजारवसुली नेमकी कोणत्या निकषांवर केली जाते आणि त्याच ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाईचे नियम काय आहेत, याबाबत स्पष्ट व पारदर्शक धोरण असावे, अशी मागणीही त्यांनी केली.
अतिक्रमणमुक्त शहरासाठी प्रशासनाच्या मोहिमेला सहकार्य करताना कारवाई सर्वांसाठी समान, कायदेशीर आणि पारदर्शक असावी. गरीब विक्रेत्यांच्या हातगाड्या तोडण्याऐवजी नियमानुसार दंडात्मक कारवाई करून त्यांचे अनावश्यक आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणी जावेद जकरिया यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.






