Home Breaking News पाचगावजवळ खासगी बस उलटली; अतिवेगामुळे अपघात, चालक फरार,   सहा प्रवासी किरकोळ...

पाचगावजवळ खासगी बस उलटली; अतिवेगामुळे अपघात, चालक फरार,   सहा प्रवासी किरकोळ जखमी

पाचगावजवळ खासगी बस उलटली; अतिवेगामुळे अपघात, चालक फरार 
सहा प्रवासी किरकोळ जखमी
कुही  : पाचगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उमरेड–नागपूर मुख्य मार्गावर पाचगाव बस स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. भिसीवरून नागपूरकडे जात असलेल्या  एमएच ए टी ९५६६ या बसचा वेग अत्यंत जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस जोराने दुभाजकाला धडकली. धडक इतकी भीषण होती की बस रस्त्यावरच पलटी झाली.
अपघात होताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खिडक्यांमधून आणि आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले.
या अपघातात एकूण सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ पाचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. जखमींमध्ये विजय बावणे, संजय बावणे, संजय गजभिये, सोनाली नागरे, वैष्णवी मेश्राम आणि केसराबाई नागरे यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, अपघातानंतर प्रवाशांना मदत करण्याऐवजी संबंधित चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी पाचगाव पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातग्रस्त वाहन पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगाव पोलीस करत आहेत.
Don`t copy text!