बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना स्वत:ला संपवलं : पदवीदान कार्यक्रमाच्या दिवशीच तरुणीने आयुष्याची दोर कापली
नागपूर : प्रियकराशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच २३ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मोठी घटना हिंगणा परिसरात घडली आहे. कानोल्हीबारा मार्गावरील भोसलेवाडी जवळील डीएनडी हाइट्स इमारतीत दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ती हिंगणा येथील आकार नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षाला शिक्षण घेत होती. ती मुळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे तिच्या मैत्रिणींनी सांगितले. काल शनिवारी नागपुरातील लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ होता. तिच्या दोन्ही मैत्रिणी कार्यक्रमासाठी गेल्या असताना ती घरी एकटीच होती. याचदरम्यान तिने प्रियकराला व्हिडिओ कॉल केला. कॉल सुरू असतानाच तिने गळफास घेतल्याचे समोर आले. ही बाब प्रियकराने तिच्या मैत्रिणींना कळविली. त्या तातडीने फ्लॅटवर परत आल्या असता हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी प्रियकराचे लग्न केल्याने ती मानसिक तणावात असल्याची चर्चा आहे.






